Pune | Sun, 05 April 2026

Ad

एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची – पल्स परिषदेत सहभागी तज्ज्ञांचे मत

Sunil Goyal | 12 views
एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची – पल्स परिषदेत सहभागी तज्ज्ञांचे मत

मुंबई दि.२७: प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, पारंपरिक वैद्यक आणि आधुनिक उपचारपद्धती यांचा समन्वय साधण्याची आवश्यकता असून एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची असल्याचे  मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी अधोरेखित केले.

बीकेसी जिओ कनव्हेंशन सेंटर येथे आयोजित पल्स परिषदेत स्ट्रेन्यनिंग प्रिव्हेंटिव अँड ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टिम: ट्रांझिशनिंग फ्रॉम कल्चर ॲसेट टू इंटीग्रेटेड मेडिसिन सिस्टिम” या विषयावरील  चर्चासत्रात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकात्मिक आरोग्य व्यवस्थेची आवश्यकता यावर मत मांडले.

या चर्चासत्रातून भारतातील पारंपरिक वैद्यक ही केवळ सांस्कृतिक ठेवा नसून ती आधुनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रभावी भाग ठरू शकते, असा निष्कर्ष समोर आला. मात्र, त्यासाठी वैज्ञानिक आधार, प्रभावी धोरणे आणि सर्व पद्धतींमधील समन्वय अनिवार्य असल्याचे स्पष्ट झाले. प्रतिबंधात्मक व पारंपरिक वैद्यक प्रणाली बळकटीकरणावर भर देण्याच्या आवश्यकतेवर ही यावेळी चर्चा करण्यात आली.

डॉ शुभ्ब स्वेन  (संचालक लेक व्हयू हेल्थ सर्विस  ) यांनी सध्याच्या आरोग्य व्यवस्थेत प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरला अधिक प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो टाळण्यावर भर दिल्यास रुग्णसंख्या कमी होईल आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताणही हलका होईल, असे त्यांनी नमूद केले.

डॉ संदीप बिपटे (ऑनकॉलॉजिस्ट ब्रीच कॅंडी हॉस्पीटल ) यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या पार्श्वभूमीवर लवकर निदान, जनजागृती आणि नियमित तपासणी यांचे महत्त्व स्पष्ट केले. पारंपरिक वैद्यक पद्धती पूरक उपचार म्हणून उपयोगी ठरू शकतात, मात्र त्यासाठी वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ जयश्री लेले (सेक्रेटरी जनरल आयएमए ) यांनी आधुनिक वैद्यक प्रणालीची विश्वासार्हता अधोरेखित करताना, पारंपरिक उपचारपद्धतींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्पष्ट धोरणे, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमन गरजेचे असल्याचे नमूद केले. एकात्मिक आरोग्य व्यवस्थेसाठी सर्व घटकांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ रुमी बेरम (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲक्युपंक्चर ) यांनी ॲक्युपंक्चर आणि इतर पारंपरिक उपचार पद्धतींचे फायदे अधोरेखित करत या पद्धतींना अधिकृत मान्यता देऊन आरोग्य व्यवस्थेत व्यापक प्रमाणात समाविष्ट करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

डॉ मनीषा उपेंद्र कोठेकर  (चेअरपर्सन नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडीसिन ) यांनी आयुष पद्धती (आयुर्वेद, योग, युनानी आदी) आणि आधुनिक वैद्यक यांचा समन्वय साधून एक सशक्त व सर्वसमावेशक आरोग्य प्रणाली उभारण्यावर भर दिला. संशोधन, मानकीकरण आणि गुणवत्तेचे निकष यांद्वारे पारंपरिक वैद्यकाला अधिक बळ मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

या चर्चासत्राचे संयोजन जितेंद्र चोक्सी यांनी केले. त्यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे विचार एकत्र आणत एकात्मिक आरोग्य व्यवस्थेची गरज अधोरेखित केली.

00000

वंदना थोरात/ वि.सं.अ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp