Pune | Mon, 13 April 2026

Ad

एसएसबी परीक्षा पूर्वतयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग

Sunil Goyal | 3 views
एसएसबी परीक्षा पूर्वतयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग

मुंबई, दि.१३: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात ४ ते १३ मे २०२६ कालावधीत मोफत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आल्याचे  सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, एसएसबी कोर्स क्रमांक ६५ अंतर्गत होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी २७ ते २९ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सकाळी १० पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.  मुलाखतीस येताना उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे यांच्या संकेतस्थळावरून SSB-65 कोर्ससाठी प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट आणणे आवश्यक आहे. तसेच संबंधित परिशिष्टे पूर्ण भरून सोबत आणणे बंधनकारक आहे.

या कोर्ससाठी उमेदवार कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेले आणि सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत. एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. तसेच युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम साठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक ईमेल training.petenashik@gmail.com, दूरध्वनी ०२५३- २४५१०३२ किंवा मोबाईल ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

००००००

एकनाथ पोवार/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp