
मुंबई, दि.29 : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे सन २०२५ चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीस आमदार विजयसिंह पंडित, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
गेवराई तालुक्यातील विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजना, तसेच प्रलंबित कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांमध्ये गुणवत्ता राखून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
गेवराई तालुक्यातील गावांमध्ये शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ठोस उपाययोजना आखाव्यात आणि नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होईल यासाठी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पाटील यांनी दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. पिण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचे सांगत जिल्ह्यातील पाणीपुरवठा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
००००००००
राजू धोत्रे/विसंअ
