Pune | Mon, 06 April 2026

Ad

ग्रामीण भागापर्यंत आधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्यास ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

Sunil Goyal | 14 views
ग्रामीण भागापर्यंत आधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्यास ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

मुंबई, दि. 23 : आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार वैद्यकीय सुविधा पोहोचविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून, ‘पल्स वैद्यकीय परिषद’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाद्वारे राज्याच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी आयोजित या परिषदेच्या नियोजनासाठी चोख तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या परिषदेत विविध देशांतील नामांकित तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते सहभागी होणार असून, आरोग्य क्षेत्रातील नव्या संधी आणि तंत्रज्ञानाचा लाभ राज्याला मिळणार आहे. सुमारे ३० संस्थांसोबत सामंजस्य करार होणार असल्याने आरोग्य सेवा, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

एकात्मिक आरोग्य व्यवस्था उभारण्यावर भर

आयुर्वेद आणि ॲलोपॅथी पद्धतींचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था उभारण्यावर या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आधुनिक व सर्वसमावेशक आरोग्य सुविधा पोहोचविण्यास मदत होणार आहे.

या व्यासपीठावर आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, औषधनिर्मिती उद्योग, स्टार्टअप आणि वेलनेस पर्यटन या क्षेत्रातील घटक एकत्र येणार असून, नव्या कल्पना आणि सहकार्याच्या संधी निर्माण होणार आहेत. परिणामी रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा, डॉक्टरांना नव्या संधी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधनाचा अनुभव मिळणार आहे.

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग, एमएमआरडीए, उद्योग विभाग, मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग तसेच विविध संस्थांचे समन्वयाने नियोजन सुरू असून, ही परिषद महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवे स्थान मिळवून देणारी ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp