
सांगली, दि. ०३ (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणांचा आढावा आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत. कोणताही निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेऊन कामकाज करावे, अशा सूचना यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यासह जिल्हा परिषदेतील संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींना जनसुविधा, नागरिकांच्या शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी कामे करण्यास प्राधान्य द्यावे. अखर्चित निधी महिनाभरात खर्च करावा. प्रत्येक कामाचा युडीआयडी काढा. लोकप्रतिनिधी व संबंधित अन्य यंत्रणांच्या समन्वयाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी 100 टक्के खर्च करण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी निर्देश दिले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर कामे सद्यस्थिती, कार्यादेश, कामांची भौतिक व आर्थिक प्रगती, प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, पूर्ण व रद्द झालेली कामे यांचा यंत्रणानिहाय सविस्तर आढावा घेतला. यामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य, जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, बालकल्याण, शिक्षण, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामकाजाची माहिती सादर केली.
00000