Pune | Mon, 03 August 2026

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महिलांच्या स्वप्नांना बळ

Sunil Goyal | 2 views
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महिलांच्या स्वप्नांना बळ

  • पौष्टिक लाडुंची खरेदी करून महिलांना स्वतः केले वाटप
  • जिल्ह्यात ९० स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी
  • ३२ महिला गृहउद्योग केंद्रांसाठी डीपीसीतून अडीच कोटींचा निधी

 सांगली, दि. ३ (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील सावळीतील महिलांसाठी सोमवारचा दिवस स्वप्नवत व अविस्मरणीय ठरला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रत्यक्ष आपल्या गावात येतात, आपण उभारलेल्या गृहउद्योग केंद्राला भेट देतात, आपल्या उत्पादनांची आत्मियतेने माहिती घेतात आणि स्वयंरोजगार विक्री केंद्राचे लोकार्पण करतात, हा क्षण येथील महिला भगिनींसाठी आनंदाची मर्मबंधातील ठेव बनला. त्यांच्या या “बंधु”तुल्य वावर आणि अनौपचारिक सहजतेने पायावर उभे राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महिला भगिनींच्या स्वप्नांना बळ दिले आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील सावळी येथे उभारण्यात आलेल्या विजयश्री महिला गृहउद्योग केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) आणि नवतेजस्विनी महिला स्वयंरोजगार विक्री (व्हेंडर स्टॉल) केंद्राच्या लोकार्पणाचा हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. पालकमंत्र्यांच्या आगमनाची चाहूल लागताच सकाळपासूनच महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहउद्योग केंद्र आणि विक्री केंद्राची सजावट, उत्पादनांची आकर्षक मांडणी आणि पाहुण्यांच्या स्वागताची लगबग सुरू होती. वाहनांचा ताफा केंद्रासमोर थांबताच महिलांच्या चेहऱ्यावरील उत्सुकतेचे रूपांतर आनंदात झाले.

तुतारीच्या निनादात पालकमंत्री चंद्रकांत पाटील केंद्रात दाखल झाले आणि काही क्षणांतच औपचारिकतेचे वातावरण आपुलकीच्या संवादात बदलले. त्यांनी प्रत्येक महिलेशी बोलत तिच्या कामाची माहिती घेतली. गृहउद्योग केंद्रातील यंत्रसामग्री, उत्पादन प्रक्रिया आणि महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ, शेवया, मसाले, विविध प्रकारची पिठे आणि पौष्टिक खाद्यपदार्थांविषयी त्यांनी आत्मियतेने चौकशी केली. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे कौतुक करताना पालकमंत्र्यांनी स्वतः काही वस्तु खरेदी केल्या. स्वयंरोजगार विक्री केंद्रातून त्यांनी पौष्टिक लाडू विकत घेतले आणि तेच लाडू उपस्थित महिला भगिनींना स्वतःच्या हाताने वाटले. त्यांच्या या छोट्याशा कृतीने महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखी खुलला. आपण तयार केलेल्या उत्पादनाला पालकमंत्र्यांनी ग्राहक म्हणून पसंती दिल्याची भावना महिलांसाठी अभिमानाची ठरली.

महिलांनी पालकमंत्र्यांसोबत छायाचित्रे काढली. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी “व्यवसाय करताना कोणालाही वस्तू मोफत देऊ नका. उत्पादनाला योग्य किंमत मिळाली, तरच व्यवसाय वाढेल आणि तुमच्या श्रमाचे मूल्य टिकेल,” असा व्यावहारिक सल्ला पालकमंत्री पाटील यांनी दिला. केंद्रातून बाहेर पडताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच “नारीशक्तीचा विजय असो” अशी घोषणा दिली. उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. या क्षणी अनेक महिलांच्या चेहऱ्यांवर आनंदाबरोबरच नव्या आत्मविश्वासाची झळाळी दिसून आली.

महिला उद्योजिकांना मिळणार नवी संधी

महिला गृहउद्योग केंद्र आणि स्वयंरोजगार विक्री केंद्रामुळे ग्रामीण महिला उद्योजिकांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे, उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करणे या केंद्रांमुळे अधिक सुलभ होईल. महिलांनी केवळ बचतगटांच्या बैठकीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. महिला सक्षमीकरणाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी

32 महिला गृहउद्योग केंद्रांसाठी डीपीसीतून अडीच कोटींचा निधी

‘महिला लखपती’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के राखीव निधीतून महिला गृहउद्योग केंद्रे आणि स्वयंरोजगार विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. महिला व बाल सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत शेतीमाल आणि अन्नप्रक्रियेद्वारे मूल्यवर्धित वस्तूंचे उत्पादन गावपातळीवर व्हावे, बचतगटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी पोर्टेबल व्हेंडर स्टॉलच्या स्वरूपात स्वयंरोजगार विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त 2 कोटी 56 लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील सात तालुक्यांत 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच जवळपास 32 लाभार्थी महिला गटांतील 384 महिला लाभार्थींसाठी महिला गृहउद्योग केंद्रे (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यात आली आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त 2 कोटी 49 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

सावळीतील हा कार्यक्रम केवळ दोन केंद्रांच्या लोकार्पणापुरता मर्यादित राहिला नाही. तो महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणारा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नवे बळ देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला.

00000

 

 

 

आमच्यात सामील व्हा