Pune | Mon, 06 April 2026

Ad

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

Sunil Goyal | 14 views
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

करमाळा-माढा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर टेंभुर्णी येथे विचारविनिमय बैठक 

सोलापूर, दि. २१ (जिमाका):- अमेरिकेच्या चुकीच्या धोरणामुळे आयात-निर्यात व्यापार ठप्प झाला असून केळी उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. उत्पादनावर खर्च जास्त असून नफा काहीच नाही. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विशेष बैठक घेऊन ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून अधिवेशनाच्या तीन दिवसांत हा प्रश्न विधिमंडळात घेतला जाईल, अशी माहिती फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

करमाळा व माढा तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी टेंभुर्णी येथे केळी फळबाग शेतकरी, व्यापारी, कंपनी प्रतिनिधी यांची विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मंत्री  श्री. गोगावले मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार अभिजीत पाटील, संजय कोकाटे, कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी हनुमंत बोराटे, तंत्र अधिकारी अभिजीत देडे तसेच मान्यवर, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, तसेच केळी व द्राक्ष उत्पादकांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा होईल. व्यापारी कंपनी व उजनी धरण पुनर्वसन संघर्ष समिती यांनी दिलेल्या निवेदनावरही विचार केला जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री श्री. गोगावले यांनी देऊन केळी व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.

माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडताना सांगितले की, “युद्धजन्य परिस्थिती, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. नाशवंत फळ ठराविक कालमर्यादेत विकले गेले नाही तर मोठे नुकसान होते. तसेच पानंद रस्ते, केळी संशोधन केंद्र व प्रक्रिया उद्योग उभारणीची गरज आहे.

प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी जिल्ह्यातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेची माहिती देऊन जिल्ह्यातील फळबाग क्षेत्रात होत असलेले वाढीविषयी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत युद्ध परिस्थितीमुळे केळी पिकाची निर्यात न झाल्यामुळे शेतकरी व व्यापारी अडचणीत आल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फळबागांची पाहणी केली व शेतकरी, निर्यातदार, व्यापारी यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

                                                                    00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp