
मुंबई, दि. १६ : केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती वेबसाईटवर सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिद्धी निवेदनाद्वारे केले आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेची गुणपडताळणी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली असून, दोन्ही प्रक्रिया उमेदवारांना विशिष्ट मुदतीत पूर्ण करावयाच्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’चे ऑनलाईन पद्धतीने तीन सत्रात आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल १३ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या परीक्षेत पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची प्रक्रिया निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आली असून, त्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती https://mscepune.in/dtcdola/KP2026Info.aspx या लिंकवर १६ ते २१ मार्च यादरम्यान भरावयाची आहे. ही माहिती केवळ नमूद लिंकमध्येच भरायची असून, ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.
या परीक्षेची गुणपडताळणी/रिस्पॉन्स शीट ही https://mscepune.in/DTEDOLA/KP2026 ResponseSheet.aspx या लिंकवर १६ ते ३१ मार्च पर्यंत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रती पेपर रुपये ५००/- असून ते सदर लिंकद्वारे भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांच्या ई-मेल वर रिस्पॉन्स शीट उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
0000
