Pune | Thu, 09 April 2026

Ad

कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता – मंत्री ॲड.आशिष शेलार

Sunil Goyal | 1 views
कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता – मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. ८ : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी परिसरातील सुमारे ३०० कि.मी. लांबीच्या किनारपट्टीपैकी २५ कि.मी. क्षेत्रात २००० हून अधिक कातळशिल्पे आढळून आली आहेत. या कातळशिल्पांमुळे प्रागैतिहासिक मानवजीवन, संस्कृती व परंपरांचा अमूल्य वारसा उलगडण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्वाचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण करण्याचा शासनाचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

माहितीपट निर्मितीसाठी दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शकांची नियुक्ती, सर्वेक्षण, अत्याधुनिक उपकरणे, वाहतूक व निवास व्यवस्था, तसेच स्टुडिओमधील एडिटिंग, साउंड आणि व्हिज्युअल इफेक्ट्स आदी कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय ड्रोन फुटेज, सिनेमॅटिक शॉट्स, उच्च-गुणवत्तेचे छायाचित्रण आणि ‘बिहाइंड द सीन’ (बीटीएस) सामग्री तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या प्रकल्पातून मिळणाऱ्या दृश्यसामग्रीच्या आधारे सोशल मीडियासाठी स्वतंत्र कंटेंट तयार करण्यात येणार असून, कातळशिल्पांच्या वैभवाचे दर्शन घडविणारा एव्ही कंटेंट बँकही उभारण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिग्दर्शकांची निवड करून शासन निर्णयानुसार करार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कातळशिल्पांचे विविध ऋतूंमध्ये, प्रकाशछटांमध्ये आणि स्थानिक लोकजीवनाशी असलेले नाते सांगणारे चित्रीकरण करण्यात येणार असून हा माहितीपट युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार होणार असून प्रकल्पाची जबाबदारी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे.

या निर्णयामुळे कोकणातील कातळशिल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल तसेच पर्यटनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास मंत्री ॲड.शेलार यांनी व्यक्त केला आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp