Pune | Mon, 08 June 2026

Ad

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कल्याण येथे वसतिगृहाची सुविधा

Sunil Goyal | 3 views
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कल्याण येथे वसतिगृहाची सुविधा

मुंबई, दि. ८ : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वतीने कल्याण येथे शासकीय मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहामुळे व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हानिहाय वसतिगृह सुरू करण्याच्या योजनेअंतर्गत हे वसतिगृह कल्याण (कृषी उत्पन्न बाजार समिती, इमारत क्र. ए-१०, पहिला मजला, कल्याण, जि. ठाणे) येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.

विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहात सन २०२६-२०२७ पासून प्रवेश देण्यात येणार आहे, तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यानंतर जागा उपलब्ध असल्यास पात्र विद्यार्थ्यांना तृतीय व चतुर्थ वर्षासाठीही प्रवेश दिला जाणार आहे. द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील अंतिम गुण विचारात घेतले जाणार आहेत.

वसतिगृहातील जागांचे आरक्षण इतर मागास वर्गासाठी ५१ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ३३ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ६ टक्के, दिव्यांगांसाठी ४ टक्के, अनाथांसाठी २ टक्के आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी ४ टक्के असे निश्चित करण्यात आले आहे. वसतिगृह प्रवेशाबाबतच्या अटी, शर्ती व अधिक माहितीसाठी नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगरच्या सहाय्यक संचालक मयुरी कदम यांनी कळविले आहे.

0000

 

 

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp