Pune | Mon, 13 April 2026

Ad

माहितीपट ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, ‘बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटांचे १४ एप्रिल रोजी विशेष प्रसारण

Sunil Goyal | 1 views
माहितीपट ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, ‘बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटांचे १४ एप्रिल रोजी विशेष प्रसारण

मुंबई, दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट आणि चित्रपटांचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवर तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर करण्यात येणार आहे. यानिमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

 

यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता, ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे दुपारी वाजता आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी वाजता करण्यात येणार आहे. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण होईल.

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा माहितीपट एक्स, फेसबुक, यूट्यूब या समाजमाध्यमांवर, तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ हा चित्रपट एक्स या समाजमाध्यमावर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी…

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण असून लाईव्ह फुटेजचाही समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटांचा असून जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य, नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले असून जी. जी. पाटील यांनी संकलन केले आहे. हा माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला असून दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले आहे. ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी निवेदन केले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी…

या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या डॉ. बाबासाहेबांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांनी तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य केले आणि शिक्षण व सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा मंत्र होता. त्यांच्या असामान्य कार्याची झलक या चित्रपटातून पाहायला मिळते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मामुट्टी यांनी, तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. तसेच मोहन गोखले आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका देखील आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांनी केले असून पटकथा सोनी तारापोरवाला, अरुण साधू आणि दया पवार यांनी लिहिली आहे. संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले असून सल्लागार श्याम बेनेगल आहेत. वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर आणि छायांकन अशोक मेहता यांचे आहे.

0000

जयश्री कोल्हे/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp