
मुंबई, दि. २८– आधुनिक काळातील मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता “आधुनिक काळातील प्रॅक्टिससाठी मानसिक आरोग्य शिक्षणाचे पुनर्रचना करणे, नैतिक आणि संदर्भाधारित व्यावसायिक घडवणे” या विषयावर आयोजित सत्रात तज्ज्ञांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजीत दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेत विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्रात NIMHANS च्या क्लिनिकल सायकोलॉजी विभागाच्या प्रा. पूर्णिमा भोला, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ तसेच न्यूरोडायव्हर्जंट मुलाचे पालक डॉ. राधिका बापट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट सुश्री इशा सोनी यांनी सहभाग घेतला. सत्राचे समन्वयन सौरभ द्विवेदी यांनी केले.
सत्रात मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी (self-care) हा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला. तज्ज्ञांनी नमूद केले की, मानसिक आरोग्य तज्ज्ञ देखिल माणूस असल्यामुळे रुग्णांच्या समस्यांशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे सेल्फ केअर ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून कार्यस्थळ, कुटुंब आणि समाज यांनीही त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.
यावेळी सेल्फ केअरचा अर्थ केवळ स्वतःला दूर ठेवणे नसून, स्वतःच्या भावना ओळखून त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे असा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. व्यक्तीने स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे, तसेच संतुलित जीवनशैली राखणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सत्रात मानसिक आरोग्य सेवेत सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात भाषा, आर्थिक स्थिती, ग्रामीण-शहरी पार्श्वभूमी यांसारख्या घटकांचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. ‘इंटरसेक्शनॅलिटी’ या संकल्पनेवर भाष्य करताना प्रत्येक व्यक्ती विविध ओळखी (identity) घेऊन येत असल्याने उपचार करताना त्या सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाला केवळ ‘केस’ म्हणून न पाहता एक व्यक्ती म्हणून समजून घेणे आणि त्याच्या दैनंदिन जीवनशैलीनुसार उपचार योजना आखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीतील बदलांवरही भर देण्यात आला. यामध्ये मोबाईलचा मर्यादित वापर, निसर्गाशी संपर्क, पुरेशी झोप, कुटुंबीय व मित्रांशी संवाद, तसेच संगीत, वाचन यांसारख्या उपक्रमांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
एकूणच, मानसिक आरोग्य क्षेत्र अधिक प्रभावी व सर्वसमावेशक करण्यासाठी संदर्भाधारित शिक्षण, मानवकेंद्रित दृष्टिकोन, प्रभावी संवाद, तसेच प्रणाली-स्तरावर (system-level) समर्थन आवश्यक असल्याचे या सत्रातून स्पष्ट झाले.
0000
