Pune | Thu, 16 April 2026

Ad

मातोश्री मुलींचे वसतिगृह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी सक्षम आधार

Sunil Goyal | 1 views
मातोश्री मुलींचे वसतिगृह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी सक्षम आधार

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना सुरक्षित निवास, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण व स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नाशिक येथे मातोश्री मुलींचे वसतिगृह कार्यान्वित करण्यात आले असून, या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाच्या संधींना लक्षणीय बळ प्राप्त होत आहे.

या वसतिगृहाची स्थापना सारथी संस्था, महाज्योती संस्था तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या वसतिगृहामध्ये एकूण 200 विद्यार्थिनींसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सारथी संस्थेअंतर्गत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील 75 विद्यार्थिनी, महाज्योती संस्थेअंतर्गत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील 75 विद्यार्थिनी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 50 विद्यार्थिनींचा समावेश करण्यात आलेला आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी महोत्सव योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीमध्ये सदर वसतिगृह सुरू करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. महाज्योती व सारथी महामंडळामार्फत या वसतिगृहाचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यात येत आहे.

विद्यार्थिनींसाठी वसतिगृहामध्ये सुरक्षित, स्वच्छ व प्रशस्त वातावरण उपलब्ध करून देण्यात आले असून, दैनंदिन गरजांसाठी विविध मूलभूत व आधुनिक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्नानासाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सोलर हीटिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी 3 वॉटर कुलर व 3 वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत.

शैक्षणिक गुणवत्तावृद्धीच्या दृष्टीने वसतिगृहामध्ये सुसज्ज ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध असून, त्यामध्ये विविध संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यास साहित्य, इंग्रजी व मराठी दैनिके तसेच शासनाचे ‘लोकराज्य’ मासिक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवरील मार्गदर्शनपर शिबिरे, कार्यशाळा व व्याख्यानांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते.

वसतिगृहातील विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात उपस्थितीच्या दिवसांनुसार दरमहा 2,800/- रुपये इतका भोजनभत्ता देण्यात येतो. तसेच महाविद्यालयीन उपस्थिती 50 टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या विद्यार्थिनींना दरमहा 800/- रुपये इतका निर्वाहभत्ता देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणातील सातत्य राखण्यास व आर्थिक अडचणी कमी करण्यास मोठी मदत होत आहे एकूणच, मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना सुरक्षित निवास, दर्जेदार शैक्षणिक सुविधा व स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध होत असून, त्यांच्या उच्च शिक्षण व करिअर घडविण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. शासनाच्या या प्रयत्नामुळे मुलींच्या सक्षमीकरणास चालना मिळत असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरत आहे.

प्रतिक्रीया
▪ मी संजना भारत बुरकूल, वेहेळगाव (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील विद्यार्थीनी असून सध्या केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक येथे शिक्षण घेत आहे. महाज्योती योजनेअंतर्गत वसतिगृहाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मला शिक्षणासाठी सुरक्षित व अनुकूल वातावरण मिळाले आहे. या सुविधेमुळे माझ्या राहणीमानाचा खर्च कमी झाला असून कुटुंबावरील आर्थिक भार हलका झाला आहे. त्यामुळे मी निर्धास्तपणे शिक्षण घेऊन माझ्या भविष्यासाठी अधिक एकाग्रतेने प्रयत्न करू शकत आहे. इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत शासकीय सेवेत प्रवेश करणे व आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करणे हेच माझे ध्येय आहे.

▪ मी रिद्धी संजय निकम, मालेगाव येथील विद्यार्थीनी असून महाज्योती विभागामार्फत वसतिगृहाची सुविधा मिळाल्यामुळे माझ्या शैक्षणिक प्रवासाला मोठा आधार मिळाला आहे. पूर्वी शिक्षणासाठी राहण्याच्या व आर्थिक अडचणींमुळे अभ्यासात सातत्य राखणे कठीण जात होते. सध्या वसतिगृहामध्ये सुरक्षित व अभ्यासास पूरक वातावरण मिळाल्याने तसेच मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे माझ्या दैनंदिन खर्चाची सोय झाली आहे. त्यामुळे मी निर्धास्तपणे व अधिक एकाग्रतेने माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून माझ्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्नशील आहे.

▪ मी अमृता शिवाजी वाघचौरे, सात्रळ (ता. राहुरी, जि. अहमदनगर) येथील विद्यार्थीनी असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नाशिक येथे आले आहे. मातोश्री मुलींच्या  वसतिगृहामुळे मला सुरक्षित निवास, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण व आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे माझ्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी झाला असून मी निर्धास्तपणे माझ्या ध्येयाकडे वाटचाल करू शकत आहे. हे वसतिगृह माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरत असून, माझ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मला मोठी प्रेरणा मिळत आहे.
00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp