Pune | Mon, 13 April 2026

Ad

मेळघाटातील ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात नवे चैतन्य

Sunil Goyal | 1 views
मेळघाटातील ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात नवे चैतन्य

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गसौंदर्याने नटलेला असला तरी, येथील दुर्गम भौगोलिक रचना आणि सामाजिक आव्हानांमुळे कुपोषण आणि माता-बाल आरोग्याचा प्रश्न नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या पार्श्वभूमीवर, मेळघाटातील आदिवासी माता आणि बालकांना आरोग्याचे कवच प्रदान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ राबविण्यात येत आहे. कुपोषणमुक्त मेळघाट हे स्वप्न साकारण्याच्या दिशेने ही योजना आरोग्यपूर्ण पिढीचा पाया रचत आहे.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर स्त्रियांना व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्याची योजना दि. 1 डिसेंबर 2015 पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मेळघाटमध्ये दोन टप्प्यात कार्य करण्यात येते. पहिल्या टप्प्यात, आदिवासी क्षेत्रातील सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या गर्भावस्थेच्या शेवटच्या सहा महिन्यांत आणि प्रसूतीनंतरच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत (स्तनदा माता) चौरस आहार दिला जातो. यामध्ये केवळ पोट भरणे हा उद्देश नसून, आहारात प्रथिनांची आणि जीवनसत्त्वांची मात्रा वाढविण्यावर भर दिला जातो. अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी यासोबतच अंडी आणि पौष्टिक लाडूंचा समावेश असतो. मार्च 2026 मध्ये, मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील 5 हजार 816 मातांनी या अमृत आहाराचा लाभ घेतला असून, त्यावर 60 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. यामुळे महिलांमधील रक्ताल्पतेचे (अ‍ॅनिमिया) प्रमाण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.

योजनेचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना आठवड्यातून चार दिवस केळी, अंडी असा पूरक आहार दिला जातो. बालपणातील कुपोषण हे शारीरिक आणि बौद्धिक वाढीतील सर्वात मोठा अडथळा असते. हा अडथळा दूर करण्यासाठी बालकांना आठवड्यातून चार दिवस अंडी किंवा तत्सम प्रथिनयुक्त आहार दिला जातो. मार्च महिन्यात मेळघाटातील एकूण 28 हजार 985 बालकांपर्यंत हा लाभ पोहोचला आहे. बालकांच्या या पोषण आहारासाठी सुमारे 36.32 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मेळघाटातील 462 अंगणवाडी केंद्रांचे जाळे आणि तिथे कार्यरत असणाऱ्या स्थानिक आहार समित्या यामुळे ही योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहे.

या योजनेमुळे मेळघाटात मातांना सकस आहार मिळतो, तेव्हा जन्माला येणाऱ्या बाळाचे वजन सुदृढ असते, ज्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. तसेच, या योजनेच्या निमित्ताने महिलांचा अंगणवाडीशी संपर्क वाढल्यामुळे त्यांना लसीकरण, वैयक्तिक स्वच्छता आणि कौटुंबिक नियोजनासारख्या महत्त्वाच्या विषयांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध होत आहे. स्थानिक महिलांचा आहार समित्यांमध्ये असलेला सहभाग त्यांच्यात निर्णयक्षमता आणि नेतृत्वाचे गुण विकसित करत आहे.

 भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या जीवनात चैतन्य फुंकणारी योजना ठरली आहे. जिल्हा प्रशासन आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या समन्वयाने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील माता आणि बालके आज खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि सशक्त होत आहेत. कुपोषणाच्या अंधारातून आरोग्याच्या प्रकाशाकडे मेळघाटाची ही वाटचाल भविष्यात एक आदर्श आरोग्य मॉडेल म्हणून निश्चित समोर येईल.

अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती.

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp