Pune | Sat, 04 April 2026

Ad

महानगर प्रदेशातील गावांचे जीआईएस प्रणालीद्वारे सर्वेक्षणासाठी संबंधितांनी अचूक डाटा उपलब्ध करून द्यावा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

Sunil Goyal | 3 views
महानगर प्रदेशातील गावांचे जीआईएस प्रणालीद्वारे सर्वेक्षणासाठी संबंधितांनी अचूक डाटा उपलब्ध करून द्यावा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर, (विमाका) ०२ : छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणामार्फत महानगर प्रदेशातील गावांचा भविष्यातील परिपूर्ण विकासासाठी, पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी  सल्लागार संस्थेची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून जीआईएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी संबंधित सर्व विभागांनी  आवश्यक तो अचूक डाटा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.

महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर तसेच नियोजन विभागासह संबंधित विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेशातील  छत्रपती संभाजनगर जिल्हयातील छत्रपती  संभाजीनगर, फुलंब्री, गंगापूर, पैठण, खुलताबाद या पाच तालुक्यातील एकूण 311 गावांमधील भौतिक, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचे निश्चित मानकांनुसार सखोल विश्लेषण करून जीआईएस प्रणालीच्या माध्यमातून सद्यस्थितीदर्शक नकाशे व सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे.

या प्रकल्पासाठी पी. एन. शिधोरे सिव्हिल इंजिनिअर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेव्दारे  प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्राधिकरण हद्दीतील मौजे सहजापूर, बाळापूर, शेंद्रा जहांगीर, कागजीपुरा व फारोळा या पाच गावांचा पथदर्शी (Pilot Study) स्वरूपात अभ्यास करण्यात आला असून त्याचा अहवाल प्राधिकरणास सादर करण्यात आला आहे. तर  उर्वरित ३०६ गावांचे सर्वेक्षण पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे.

यासाठी सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच आस्थापनांकडून आवश्यक माहिती संकलित करणार असून आवश्यक त्या ठिकाणी छायाचित्रणासह स्थळपाहणी देखील करण्यात येणार आहे.

यासाठी संबंधित सर्व शासकीय कार्यालये, आस्थापना तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी या संस्थेस आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध करून दयावेत. तसेच नागरिकांनीही या सर्वेक्षण कार्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन  महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

०००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp