
- शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
मुंबई, दि. २३ : शासकीय कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड तंत्रज्ञान आणि डेटा सेंटरचा प्रभावी वापर करण्यावर राज्य शासन भर देत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत महाराष्ट्राला एआयच्या वापरात देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मंत्रालयात सुरू करण्यात आलेल्या ‘टेक थर्सडे’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागा मार्फत ‘टेक थर्सडे’उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मुख्य सचिव राजेश अग्रवाल बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, आयुक्त एस.भुवनेश्वरी विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधानसचिव व सचिव, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, देशातील सुमारे 50 ते 60 टक्के डेटा सेंटर क्षमता आणि एआय पायाभूत सुविधा महाराष्ट्रात असून हे नेतृत्व कायम राखण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक ग्रीन डेटा सेंटर उभारणीसाठी अक्षय ऊर्जेचा वापर, तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्य दिले जात आहे. शासकीय माहितीची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘महा एआय’ आणि ‘सर्वम’ यासारखी एआय मॉडेल्स राज्याच्या स्वतःच्या सर्व्हर आणि जीपीयू पायाभूत सुविधांवर कार्यरत असल्याने संवेदनशील शासकीय माहिती बाह्य क्लाउड किंवा परदेशी सर्व्हरवर जाणार नाही. कृषी क्षेत्रात अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत एआय-आधारित व्हॉईस बॉटद्वारे मार्गदर्शन पोहोचविण्यात येत असून नंदुरबारसारख्या भागातील शेतकऱ्यांनाही भिली भाषेत सल्ला उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मसुदा तयार करणे, शासन निर्णय शोधणे आणि विधिमंडळ प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी एआय-आधारित सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या सर्व्हर आणि जीपीयूच्या आधारे विकसित केलेले ‘महा-एआय’ हे संपूर्णपणे सुरक्षित आणि स्वायत्त व्यासपीठ आहे. भविष्यातील ‘एजंटिक एआय’ नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल. नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी अर्ज भरणे, डिजीलॉकरमधून आवश्यक कागदपत्रे मिळविणे किंवा विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी केवळ एआयशी संवाद साधावा लागेल. त्यानंतर अर्ज भरण्यापासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंतची सर्व कामे ‘एआय’ स्वतःहून करेल. याशिवाय वीजबिल भरणे, सर्वात स्वस्त प्रवास तिकीट शोधून बुक करणे, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये टेबल आरक्षित करणे, ई-मेलला उत्तर देणे यांसारखी अनेक दैनंदिन कामेही एजंटिक एआयच्या माध्यमातून स्वयंचलितपणे पार पडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘टेक थर्सडे‘ उपक्रमातून तंत्रज्ञान साक्षरतेला नवी दिशा – सचिव विरेंद्र सिंह

इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहावी, शासकीय अधिकाऱ्यांमध्ये तंत्रज्ञान साक्षरता वाढावी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशासनाला चालना मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘टेक थर्सडे‘ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे १३ वर्षांपूर्वी तत्कालीन माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव तथा विद्यमान मुख्य सचिव यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘टेक सॅटरडे‘ या यशस्वी उपक्रमाचे नव्या स्वरूपातील रूपांतर म्हणजे ‘टेक थर्सडे‘ हा आहे.या उपक्रमामुळे प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधिक प्रभावीपणे होणार आहे असेही ते म्हणाले.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे सक्षम डेटा सेंटरची गरज झपाट्याने वाढली : सलीम सय्यद
सबमर इंडियाचे एआय एआय डेटा सेंटर डिझाईन अँड बिल्डचे उपाध्यक्ष सलीम सय्यद यांनी ‘सक्षम डेटा सेंटर व त्यांची आवश्यकता समजून घेणे’या विषयावर माहिती दिली.कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या वापरामुळे जगभरात उच्च क्षमतेच्या डेटा सेंटरची मागणी वेगाने वाढत आहे. मोबाईलवरून जेवण मागवणे, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा किंवा क्लाऊडवर आधारित व्यवसाय असो, या प्रत्येक सेवेमागे डेटा सेंटर हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.आता पारंपरिक डेटा सेंटरचे स्वरूप बदलत असून अधिक शक्तिशाली, र्जा-कार्यक्षम आणि अत्याधुनिक एआय डेटा सेंटर उभारण्यावर भर दिला जात आहे. विविध डिजिटल सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी डेटा सेंटरची भूमिका महत्त्वाची आहे.
सलीम सय्यद म्हणाले की, डेटा सेंटरची गुणवत्ता आणि विश्वासार्हता ‘टियर’ प्रणालीद्वारे मोजली जाते. टियर वन आणि टियर टु डेटा सेंटरमध्ये तुलनेने अधिक डाऊनटाईम असतो, तर टियर तीन डेटा सेंटरमध्ये वर्षभरात केवळ सुमारे १.६ तास सेवा खंडित होण्याची शक्यता असते. टियर चार हे डेटा सेंटर हे सर्वाधिक विश्वासार्ह मानले जाते. अशा केंद्रांमध्ये वर्षभरात केवळ काही मिनिटांचा डाऊनटाईम असतो. त्यामुळे बँका, शेअर बाजार, सरकारी यंत्रणा आणि महत्त्वाच्या वित्तीय संस्थांकडून टियर चार डेटा सेंटरला प्राधान्य दिले जाते. डिजिटल भारताच्या वाटचालीत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या युगात डेटा सेंटर ही केवळ तांत्रिक सुविधा नसून देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया बनत आहेत. आगामी काळात एआय, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता सक्षम, सुरक्षित आणि ऊर्जा-कार्यक्षम डेटा सेंटरची उभारणी हीच भविष्यातील सर्वात मोठी गरज ठरणार आहे.
सार्वजनिक क्षेत्र या विषयाचे सर्वम एआयचे जीटीएम साहिल खेतन यांनी चॅटजीपीटीचे दैनंदिन जीवनातील महत्व या विषयी सविस्तर माहिती दिली.
उपाध्यक्ष अमोद कबाडे यावेळी उपस्थित होते. यावेळी महाआयटीचे चिफ ऑपरेटीव्ह ऑफीसर भगवान पाटील यांनी आभार मानले. प्रायमस पार्टनरच्या आदिती धनावडे यांनी सूत्रसंचालन केले.
००००
संध्या गरवारे/विसंअ
