Pune | Fri, 10 April 2026

Ad

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम

Sunil Goyal | 3 views
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम

मुंबई, दि. 10 :  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा व्यापक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नुकतेच एक पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अंतर्गतच्या उपक्रमांबाबत अवगत केले.

महात्मा फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि शिक्षणावरील बंधने याविरुद्ध लढा देत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समता, सामाजिक न्याय आणि मानवी मुक्तीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फुले दांपत्याने शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.

या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक आणि कौशल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. 11 एप्रिल 2026 रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमांची सुरुवात होणार आहे.

व्याख्याने, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी महात्मा फुले यांच्या कार्यावरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असून शाळांमध्ये वाचनालये ज्ञानकेंद्र म्हणून विकसित केली जाणार आहेत. तसेच त्यांच्या विचारांवर आधारित व्याख्याने, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांचा प्रसार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

शालेयस्तरावर पथनाट्य, एकपात्री नाटके, समता दौड, ग्रामभेट, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, विज्ञान उपक्रम, आयसीटी आधारित उपक्रम अशा विविध स्पर्धा व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह’ साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा प्रयत्न होणार आहे. याशिवाय, #Phule200 या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी साजऱ्या केलेल्या उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि साहित्य ऑनलाइन अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत या सर्व कृती कार्यक्रमांचे आयोजन शाळांसाठी अनिवार्य राहणार असून विद्यार्थ्यांचा सहभाग ऐच्छिक असेल.

महिनानिहाय आखलेल्या कृती आराखड्यानुसार एप्रिलमध्ये जनजागृती, जूनमध्ये पर्यावरण व जलसंवर्धन, जुलैमध्ये सामाजिक समता, ऑगस्टमध्ये समाजसेवा, सप्टेंबरमध्ये नवोपक्रम, ऑक्टोबरमध्ये स्त्री सक्षमीकरण, नोव्हेंबरमध्ये नेतृत्व व नागरिकत्व, डिसेंबरमध्ये सांस्कृतिक विकास, जानेवारीत संशोधन प्रकल्प, फेब्रुवारीत विविध स्पर्धा आणि मार्च 2027 मध्ये समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून दरमहा आढावा घेतला जाणार असून संबंधित यंत्रणांना नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महात्मा फुले यांची 200 वी जयंती ही केवळ उत्सव नसून सामाजिक परिवर्तनाची संधी आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करत विद्यार्थ्यांमध्ये समता, शिक्षण आणि मानवता या मूल्यांची रुजवण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यानिमित्ताने केले आहे.

 

00000

बी.सी.झंवर/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp