
नवी दिल्ली, दि. ११ : साहित्य मानवी व्यक्तिमत्वाला यंत्रमानव होऊ देत नाही. मनाची तरलता साहित्य जिवंत ठेवते. त्यामुळे चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर माऊलीचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती अखंड सुरू ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या सहकार्याने सरहद संस्था, पुणे यांनी येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या याचे उद्घाटन झाले.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात हे संमेलन विविध दालनात होत असून मुख्य समारंभ स्थळाला छत्रपती महाराणी ताराराणी दालन नाव देण्यात आले आहे. ताराराणी यांच्या जयंतीचे हे ३५१ वे वर्ष आहे. मंचावर मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका माजी अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहंदळे, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, मुख्य संयोजक सरहदच्या सुषमा संजय नहार, सहसंयोजक लेशपाल जवळगे यांची उपस्थिती होती.

देशभरातील महिला अधिकारी साहित्यिकांपुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेची समृद्धी विशद केली. भारतातल्या किंवा जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनापेक्षा मराठीत होणारी संमेलने सर्वाधिक आहेत. झाडीपट्टी पासून ते विद्रोही साहित्य संमेलनापर्यंत हा साहित्यिकांचा मेळा सर्वाधिक मराठीत फुलतो.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाचा गौरव करताना त्यांच्या ३५१ व्या जयंती पर्वावर होत असलेल्या महिला साहित्य संमेलनाचे कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर पुढची ६४ वर्ष ताराबाईनी स्वराज्याचे रक्षण करतांना मुघलांना सळो की पळो करून सोडले. स्वराज्याची संकल्पना करतानाच त्यांनी उत्तम प्रशासन राबवून महाराणी ताराराणी यांनी सर्व समाजाला एकत्र आणले. त्यांचा आदर्श प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठेवायला हवा. फाईलींमध्ये हरवून जाणाऱ्या शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या या साहित्य संमेलनांनानी भाव विश्वाला सांभाळण्याचे काम या साहित्य संमेलनातून झाले आहे. ‘निर्णयार्थ सादर’ अशा शासकीय शेऱ्यापेक्षा कविता आणि कादंबऱ्यामधून प्रगत होणारी ही भाषा संवेदनशील आणि तरल आहे. त्यामुळे खरोखर आनंद होत आहे.यावेळी त्यांनी महिलांच्या मल्टीटास्किंग कौशल्याचे कौतुक करताना महिला अधिकारी दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतात असे सांगितले. आपल्या कार्यकाळात राज्याच्या मुख्य सचिवांपासून तर मुंबई महानगरपालिका आयुक्तांपर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांवर महिलांची वर्णी लागल्याचेही त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आव्हानाच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या पुढे मानवाला वाटचाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढचे एखादे संमेलन यंत्रमानवांचे देखील घ्यावे लागू शकते. तथापि, तंत्रज्ञानापेक्षा माणूस कायम अग्रेसर राहणे आवश्यक आहे. साहित्य व्यक्तिमत्त्वाला यंत्रमानव होऊ देत नाही मनाची तरलता जीवंत ठेवण्यासाठी साहित्याची निर्मिती करत रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले, राज्यातील सर्व मराठी भाषेतील पोर्टल अपडेट राहील. मराठी भाषा इंटरनेटवर अधिक प्रभावी होईल संस्कृत भाषेचे प्रमोशन करण्यात येईल. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेसाठी 75 मंच तयार करणार आहोत .प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्याला पुरस्कार देण्यासाठी मराठी भाषा विभाग पुढाकार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सोबतच ग्रामीण भागाच्या साहित्यासाठी, बाल ,महिला यांच्याही साहित्याला पुरस्कार देण्यात येईल. वारकरी संमेलन आयोजित करण्यात येईल,अशी ही घोषणा त्यांनी केली.
संमेलनाध्यक्ष लीना मेहंदळे यांनी या संमेलनाचा संदर्भ देत महाराष्ट्राने सुरू केलेल्या या प्रयोगाचा कित्ता राज्यांनी ही गिरवावा. भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या साहित्य कोणाला वाव द्यावा. पुरस्कार द्यावा. तसेच संगणक प्रणालीवर मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती लिखाण अधिक सुलभ सहज करण्यासाठी प्रयत्न करावे,इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवावी आणि संस्कृतचे प्रमोशन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी मराठी साहित्यातील महिला साहित्यिकांचे योगदान लक्षात घेता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिला साहित्यिकांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशासनात महिलांच्या सहभागामुळे प्रशासन आणखी लोकाभिमुख होत असल्याचे त्यांनी सांगितले
सचिव तथा निवासी आयुक्त आर विमला महिला अधिकारी संमेलन आयोजनामागची भूमिका विषद केली. फाईलच्या गर्दीत कविता सांभाळणाऱ्या देशभरातील कानाकोपऱ्यातील महिला अधिकाऱ्यांनी यासाठी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी महिला जगताचे आभार व्यक्त केले. तसेच या पहिला प्रयोगाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल त्यांचे आभार मानले. महाराणी ताराबाई यांच्या 351 व्या जयंती वर्षा निमित्त या संमेलनाच्या आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनातून तलवारीपेक्षा लेखणीचे महत्त्व किती अधिक आहे, हे महिला साहित्यिकांच्या या मेळातून सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक साहित्य संमेलनाच्या आयोजन करणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी केले. यावेळी भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी निलांबरी जगदाळे भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी अरुणा लिमये यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये आर. विमला यांच्या जिओ मेरे मन, लीना मेहंदळे यांच्या ऑल टाइम रिफ्लेक्शन ऑन चेंजिंग इंडिया, ॲड. निशा चव्हाण यांच्या लीगल ऑफ भिडे वाडा, मयूर मसुरकर यांच्या महाराणी ताराराणी, गीतांजली टेमगिरे यांच्या मधुमालती डॉक्टर मंगल पांचाळ धोटे यांच्या अंतरणात या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
निरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.
०००
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
