Pune | Mon, 06 April 2026

Ad

मनोरा आमदार निवाससाठी ५५.५० कोटींच्या विकास शुल्कासह वाढीव खर्चाला मंजुरी

Sunil Goyal | 11 views
मनोरा आमदार निवाससाठी ५५.५० कोटींच्या विकास शुल्कासह वाढीव खर्चाला मंजुरी

मुंबई, दि. 24 : ‘मनोरा’ आमदार निवास पुनर्बांधणी प्रकल्पासंदर्भात विधान भवन येथे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. प्रकल्पाच्या वाढीव खर्चासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 55 कोटी 50 लाख रुपयांच्या विकास शुल्कास बैठकीत मंजुरी देण्यात आली.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपर मुख्य सचिव (सा.बां.वि) मिलिंद म्हैसकर, मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, मेघना तळेकर इटकेलवार सचिव (2), शिवदर्शन साठ्ये (4) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पाची कामे निश्चित वेळेत आणि गुणवत्तेशी तडजोड न करता पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

या इमारतींचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून पहिल्या इमारतीचे 19 मजले तर दुसऱ्या इमारतीचे 20 मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.         नूतन मनोरा आमदार निवासची इमारत आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असेल. यामध्ये स्वतंत्र व सुसज्ज निवासस्थान तसेच इमारतीमध्ये मिनी थिएटर, अत्याधुनिक जिम, सुसज्ज उपहारगृहे आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

००००

जनसंपर्क अधिकारी/विधानभवन

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp