
नाशिक, दि. २० (जिमाका): जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेऊ नयेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कश्मिरा संखे (कळवण), मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी सांगितले की, सन 2002 च्या यादीतोल नावांची स्वयंजुळवणी तसेच कुटुंबातील एका मतदाराच्या नावावरून अन्य सदस्यांच्या नावांची जळवणीच्या कामाला गती द्यावी. मतदार यादीतील मतदारांची अस्पष्ट छायाचित्र, निरर्थक नोंदी दुरुस्तीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेट देत मतदारांची सुस्पष्ट आणि रंगीत छायाचित्र संकलित करून बीएलओ अॅपमध्ये अपलोड करावीत. तसेच समान नाव आणि छायाचित्र असलेल्या मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत आवश्यक त्या दुरुस्ती करून घ्याव्यात, मतदारांचे अर्ज क्रमांक सहा, सात आणि आठवर तत्काळ कार्यवाही करावी. कोणतेही अर्ज 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदारांनी संपर्क केल्यावर त्यांना तत्काळ प्रतिसाद द्यावा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. मतदार नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असही निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी दिले.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात एकूण 51 लाख 56 हजार मतदार आहेत, या मतदारांपैकी 2002 मध्य विशेष सखोल पुनरीक्षण करून तयार झालेल्या मतदार यादीशी विद्यमान मतदारांची जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 15 लाख 16 हजार मतदारांच्या जुळवणीचे काम पूर्ण झाल आहे. या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असेही त्यानी सांगितले.
०००
