
मुंबई, दि. १३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ०८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत सामाजिक समता सप्ताह मुंबई शहर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला. या अंतर्गत ८ ते १३ एप्रिल या कालावधीत विविध उपक्रमांनी सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तर १४ एप्रिल रोजी मुंबई शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मुंबई शहर प्रसाद खैरनार यांनी दिली आहे.
१४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये अभिवादन कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्रे व विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयांमध्ये ऑनलाइन वैधता प्रमाणपत्र वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सप्ताहाची सुरुवात ०८ एप्रिल रोजी उद्घाटनाने झाली. ०९ एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये व शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व, निबंध व लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १० एप्रिल रोजी पथनाट्य व लघुनाटिकांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. १२ एप्रिल रोजी ‘संविधान जागर’ उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाविषयी व्याख्याने आयोजित करण्यात आली. १३ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक मेळावे, रक्तदान शिबिरे तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे.
0000
शैलजा पाटील/विसंअ
