
मुंबई दि. १० : मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी, बोरीवली व कुर्ला तहसील कार्यालयांतर्गत मंडळनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री, अॅड आशिष शेलार, खासदार अनिल देसाई, आमदार अस्लम शेख, पराग आळवणी, मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, तुकाराम काते, मुंबई उपनगर जिल्हायातील नगरसेवक जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते. महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रामध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना महसूल विषयक सेवा जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. या अभियानांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून प्रलंबित महसूल प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या महसूल विषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी गावपातळीवर तसेच कार्यालयीन स्तरावर विशेष प्रयत्न करत आहेत.
शिबिरात विविध शासकीय दाखले, ७/१२ उतारे, आधार नोंदणी, रेशनिंगसंबंधित प्रलंबित कामे तसेच विविध योजनांचे अर्ज स्वीकारून अनेक प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. तसेच ‘संगांयो’ श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना व आयुष्यमान भारत कार्डाचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूल विभाग, नगर भूमापन कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग, शिधावाटप कार्यालय, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), महिला बचत गट, समाज कल्याण विभाग, या कार्यालयांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले.
शिबिरात नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा थेट लाभ घेतला. मुंबई उपनगर जिल्हयातील लोकसभा सदस्य व विधानसभा सदस्य यांनी उपक्रमाची पाहणी केली. प्रातिनिधीक स्वरुपात विविध प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शिबिरांतर्गत एकूण २६३५ प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आलेले आहेत. प्रशासनाने शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या या लोकाभिमुख उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.
0000
