Pune | Fri, 10 April 2026

Ad

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ला सुरुवात

Sunil Goyal | 3 views
मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ला सुरुवात

मुंबई, दि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सामाजिक समता सप्ताह’ कार्यक्रमाची मुंबई उपनगर जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहायक आयुक्त रविकिरण पाटील यांनी दिली.

दि. ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहाचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती, जमाती तसेच वंचित व दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि समाजात जनजागृती निर्माण करणे हा आहे. यंदाचा समता सप्ताह विशेष ठरणार असून, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात दररोज विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. ८ एप्रिल रोजी उद्घाटन व पत्रकार परिषद, ९ एप्रिल रोजी चवदार तळे सत्याग्रहावर व्याख्याने व वक्तृत्व स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांत निबंध व वक्तृत्व स्पर्धा, १० एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा घेण्यात आली. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित कार्यक्रम, १२ एप्रिल रोजी संविधान विषयक जनजागृती व्याख्यान व महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच १३ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर आणि रक्तदान शिबिर, तर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्याने, चर्चासत्रे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांत मुंबई उपनगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp