Pune | Mon, 06 April 2026

Ad

निरोप समारंभ हा पूर्णविराम नसून नव्या प्रवासाची सुरुवात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Sunil Goyal | 7 views
निरोप समारंभ हा पूर्णविराम नसून नव्या प्रवासाची सुरुवात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. २४:- विधान परिषद सदस्यांचा निवृत्त समारंभ हा भावनिक क्षण असला तरी तो पूर्णविराम नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे. सभागृहाच्या समृद्ध परंपरेला न्याय देत या सदस्यांनी जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांचा साधेपणा, अभ्यासू वृत्ती आणि जनतेशी असलेल्या नात्यामुळे त्यांनी स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या ९ सदस्यांना निरोप  देताना काढले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  यांनी  उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि संजय केणेकर या ९ सदस्यांच्या  कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी  विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांच्या कार्याचा उल्लेख करत  त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांच्या कामाचा त्यांनी गौरव केला. तसेच विविध सामाजिक घटकांचे प्रश्न मांडण्यात इतर सदस्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.

प्रत्येक सदस्याने आपल्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी, नेतृत्व करत सभागृहाची उंची वाढवली आहे. विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी प्रामाणिकपणे आणि सामाजिक भावनेतून केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी निवृत्त होत असलेल्या  सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

००००००

एकनाथ पोवार/स.सं

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp