Pune | Sun, 15 February 2026

Ad

नवीन कामगार संहितेच्या नियमांमध्ये सिने कलाकारांसाठी तरतुदी समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

Sunil Goyal | 3 views
नवीन कामगार संहितेच्या नियमांमध्ये सिने कलाकारांसाठी तरतुदी समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, दि. ११ : नवीन कामगार संहिता केंद्र सरकारकडून तयार करण्यात आली असून, सदर संहितेअंतर्गत नियमावली तयार करण्यात येत आहे. नियमावलीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यापूर्वी जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले.

सद्यस्थितीत सिने क्षेत्रातील कलाकारांसाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत नवीन कामगार संहितेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या नियमांमध्ये तरतुदी करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, उपसचिव रोशनी कदम-पाटील, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लो यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिने क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांसाठी नवीन कामगार संहितेतील तरतुदींबाबत चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा, वेतन, विमा, कामाचे तास, कल्याणकारी योजना आदी तरतुदींची अंमलबजावणी याबाबी समाविष्ट आहेत.

यावेळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम ढिल्लो यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक व विविध विभागांतील कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.

कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, कामगार संहितेमध्ये ऑडीओ-व्हिज्युअल क्षेत्रातील कामगारांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींनुसार सिने क्षेत्रातील कलाकार व संबंधित कामगारांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार नवीन कामगार संहितेमध्ये त्यांना सामाजिक, आर्थिक संरक्षणाच्या तरतुदी समाविष्ट आहेत.

सिने कलाकारांना द्यावयाच्या संरक्षणाच्या तरतुदींबाबत सविस्तर सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्यानुषंगाने कामगार संहितेस अनुसरुन तयार करण्यात येणाऱ्या नियमांच्या प्रारुप अधिसूचनेच्या अनुषंगाने सूचना व हरकती सादर करण्याबाबत ‘सिंटा’च्या अध्यक्षांना सूचित करण्यात आले. अंतिम नियमांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यापूर्वी सिने कलाकारांकडून आलेल्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येतील, असे मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले.
०००
राजू धोत्रे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp