Pune | Sun, 05 April 2026

Ad

नवोन्मेषी मनुष्यबळ धोरणांमुळे सक्षम आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल

Sunil Goyal | 7 views
नवोन्मेषी मनुष्यबळ धोरणांमुळे सक्षम आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल

मुंबई, दि. 29 : नवोन्मेषी मनुष्यबळ धोरणे राबवून भारतात सक्षम आणि भविष्योन्मुख आरोग्य व्यवस्था उभारण्याची वाटचाल सुरू झाली आहे. प्रभावी आरोग्य सेवेसाठी केवळ सुविधा वाढवून भागणार नाही; तर प्रशिक्षित, समन्वित आणि तंत्रज्ञानसहाय्यित मनुष्यबळावरच आरोग्य क्षेत्राची खरी ताकद अवलंबून आहे. लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूप, असंसर्गजन्य आजार, डॉक्टर तुटवडा आणि शहरी-ग्रामीण दरी यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यनिहाय लवचिक धोरणे, डिजिटल हेल्थ, सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि आयुष-आधुनिक वैद्यकांचा समन्वय यावर भर देण्याची गरज मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील ‘पल्स वैद्यकीय परिषदेत 2026’   “आरोग्य व्यवस्था आणि मनुष्यबळ” या विषयावर झालेल्या पॅनल चर्चेत व्यक्त करण्यात आली.

या पॅनल चर्चेत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण,  माजी  मुख्य सचिव  जयंत कुमार बांठिया, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक (आरोग्य प्रणाली) मनोज झलानी, उषालक्ष्मी ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशनचे संस्थापक डॉ. पी.रघु राम, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाचे जनरल सर्जरी संचालक डॉ. मुफ्फजल लकडावाला आणि भारतीय वैद्यक पद्धती राष्ट्रीय आयोगाचे नैतिकता व नोंदणी मंडळ सदस्य डॉ. नारायण एस. जाधव यांनी सहभाग घेतला. या चर्चेचे समन्वयन ‘चक्र’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रंजना कुमार यांनी केले.

माजी  मुख्य सचिव    जयंत कुमार बांठिया यांनी लोकसंख्या आणि आजारांच्या बदलत्या स्वरूपामुळे केवळ मृत्युदर कमी करण्यावर न राहता असंसर्गजन्य आजारांवर केंद्रित धोरणांची आवश्यकता असल्याचे सांगितले. सर्व राज्यांसाठी एकसारखी धोरणे न ठेवता त्यांच्या गरजेनुसार आरोग्य व्यवस्था पुनर्रचित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रेडियोलॉजी, निदान सेवा आणि फिजिओथेरपी उपलब्ध करण्याची गरज व्यक्त करत, सुरक्षित पाणी, पोषण आणि जीवनशैलीशी संबंधित घटकांचा समन्वय साधल्यासच लोकांच्या आरोग्यात खऱ्या अर्थाने सुधारणा होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विविध वैद्यकीय शाखांमध्ये आंतरशाखीय शिक्षण आणि सहकार्य वाढवण्यावर जयंत कुमार बांठिया यांनी भर दिला.

यावेळी डॉ इंदू भूषण यांनी भारतातील आरोग्य व्यवस्थेसाठी एकात्मिक, लवचिक आणि राज्यनिहाय भिन्न गरजांना अनुरूप अशी रचना आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. डिजिटल हेल्थ, डेटा व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने केवळ सेवा उपलब्धता नव्हे, तर गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण उपचार साखळी उभारण्यावर त्यांनी भर दिला.

0000

दत्तात्रेय कोकरे/वि.स.अ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp