Pune | Sun, 05 April 2026

Ad

नवोन्मेषी उपचारपद्धतीवर भर गरजेचा -पल्स-२०२६ परिषदेत तज्ज्ञांचे मत

Sunil Goyal | 12 views
नवोन्मेषी उपचारपद्धतीवर भर गरजेचा -पल्स-२०२६ परिषदेत तज्ज्ञांचे मत

मुंबई, दि. २७ : भारतासह जगभरात दीर्घकालीन आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, पारंपरिक उपचार पद्धतींपलीकडे जाऊन सहकार्यात्मक व नवोन्मेषी उपचार पद्धतींवर भर देणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य क्षेत्रातील आघाडीवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन विचारमंथन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत तज्ञांनी केले.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग आयोजित “पल्स” २०२६ या कार्यक्रमात “दीर्घकालीन आजारांच्या उपचारासाठी नव्या आरोग्य सेवा पद्धती” या विषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ.संगीता रावत, डॉ.सोनालिनी खेत्रपाल, डॉ. विनिता सबनीस-मंजुरे, डॉ .अपर्णा बेलापूरकर तसेच डॉ. रिचा सिंह यांनी मत व्यक्त केले.

या चर्चासत्रात डिजिटल आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), टेलिमेडिसिन, तसेच रुग्ण-केंद्रित उपचार पद्धतींचा वापर यावर विशेष भर देण्यात आला. आयआयटी मुंबई येथील डिजिटल हेल्थ सेंटरच्या प्रतिनिधींनी तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि वैद्यकीय क्षेत्र यांच्या संगमातून आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणता येईल, असे नमूद केले.

सार्वजनिक रुग्णालयांतील अनुभव मांडताना तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, दीर्घकालीन आजारांवर मात करण्यासाठी बहुआयामी (मल्टी-डिसिप्लिनरी) टीमवर्क आणि रुग्णांच्या उपचारांमध्ये सातत्य राखणे अत्यावश्यक आहे. मोठ्या रुग्णसंख्येमुळे ही प्रक्रिया आव्हानात्मक असली तरी, एकाच डॉक्टरकडून सातत्याने उपचार मिळाल्यास रुग्णांची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत तज्ज्ञांनी सांगितले की, युनायटेड किंगडमसारख्या देशांमध्ये रुग्ण-केंद्रित ‘पाथवे बेस्ड’ उपचार पद्धती प्रभावी ठरली आहे. रुग्णालयातील उपचारांपासून ते पुनर्वसन आणि समाजात पुनर्स्थापना यापर्यंत संपूर्ण प्रवास एकात्मिक पद्धतीने हाताळला जातो. तसेच ‘शेअर्ड केअर रेकॉर्ड्स’मुळे विविध विभागांमध्ये समन्वय साधणे सुलभ होते.

डिजिटल आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी टेलिमेडिसिन, रिमोट पेशंट मॉनिटरिंग आणि इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स (ईएमआर) हे दीर्घकालीन आजार व्यवस्थापनातील महत्वाचे साधन असल्याचे सांगितले. कोविड-१९ नंतर ऑनलाइन सल्लामसलतींचा स्वीकार मोठ्या प्रमाणात वाढला असून, दुर्गम भागांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यात याचा मोठा फायदा होत आहे.

याशिवाय, आरोग्य क्षेत्रातील वित्तपुरवठा, धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) आणि परिणामाधारित (आउटकम-बेस्ड) मॉडेल्स यांची गरजही चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. दीर्घकालीन आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ उपचार नव्हे, तर प्रतिबंध, सातत्यपूर्ण निगा आणि रुग्णांच्या स्व-देखभालीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या चर्चासत्रात पुढील टप्प्यातील आव्हाने आणि उपाययोजना यांवरही चर्चा झाली. उत्कृष्टतेच्या काही ठिकाणांपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण देशभरात टिकाऊ आणि विस्तारक्षम (स्केलेबल) आरोग्य मॉडेल विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

0000

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp