Pune | Fri, 17 July 2026

Ad

नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Sunil Goyal | 13 views
नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी  – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ९ : पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने समाजासमोर मांडाव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील महत्त्वाचे साधन असले तरी भविष्य केवळ एआयवर अवलंबून नसून त्याच्या वापराला दिशा देणारी मानवी बुद्धिमत्ता, विवेक, सद्सद्विवेकबुद्धी आणि मूल्ये यावरच ते अवलंबून आहे. पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास, सकाळ मीडिया समूहाचे समूह संपादक निलेश खरे, वरिष्ठ पत्रकार सरिता कौशिक, मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष किरण जोशी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, राज्यातून आलेले पत्रकार आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक नेतृत्व दिले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव अशा संतांनी समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला आहे तसेच लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांनी पत्रकारिता आणि लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे अविस्मरणीय कार्य केले. महाराष्ट्रातील पत्रकारांना या समृद्ध परंपरेचा वारसा लाभला असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

उदारीकरणानंतर माध्यम क्षेत्रात मोठे बदल झाले असून उपग्रह वाहिन्या, इंटरनेट, डिजिटल आवृत्त्या, सामाजिक माध्यमे, ऑनलाइन पोर्टल्स आणि पॉडकास्ट यांच्या माध्यमातून माहितीच्या प्रसारणाची आणि ग्रहण करण्याची पद्धत पूर्णपणे बदलल्याचे राज्यपालांनी सांगितले. या बदलांमुळे माध्यम संस्थांना सतत नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेची पत्रकारांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. तथापि, एआयमुळे दिशाभूल करणारी माहिती, डीपफेक तंत्रज्ञान आणि बनावट दृश्य सामग्रीच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. नागरिकांचा माध्यमांवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सत्य पडताळणी आणि पत्रकारांची संपादकीय जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राज्यपाल म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने त्यांनी विद्यापीठांना माध्यम अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. एआय साक्षरता, डिजिटल नैतिकता, डेटा पत्रकारिता आणि माध्यम पडताळणी यांसारख्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी पत्रकार संघाने कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर पत्रकारांचे महाअधिवेशन आयोजित केल्याबद्दल राज्यपालांनी संघाचे अभिनंदन करीत सर्व पत्रकार बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या.

 

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp