Pune | Sun, 05 April 2026

Ad

पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 5 views
पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा; परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.२८: ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, पल्स २०२६ परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमाच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री.फडणवीस यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, दोन दिवस चाललेल्या या परिषदेत एकूण 15 सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. त्यापैकी 3 करारांद्वारे सुमारे 720 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित करण्यात आली, तर 12 करार धोरणात्मक भागीदारीचे होते. परिषदेत 10 हून अधिक देशांतील 130 पेक्षा जास्त तज्ञ आणि 3000 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ही केवळ परिषद आयोजित केली नाही, तर पुढील दशकात महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची दिशा निश्चित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये ‘बल्क ड्रग्ज पार्क’साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स या कंपन्यांकडून एकत्रित 520 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनीने 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. यामुळे राज्यातील औषधनिर्माण क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत 11 महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. यात रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ ग्लासगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणासाठी सहकार्य करार करण्यात आले. तसेच मँचेस्टर युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने क्रीडा औषधनिर्माण क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार आहे.

कर्करोग व अत्याधुनिक उपचारांसाठी ‘4बेस केअर’ सोबत कॅन्सर इंटेलिजन्स प्रकल्प, तर मेड्ट्रॉनिक सोबत ‘स्ट्रोक सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यासाठी करार करण्यात आले. यामुळे राज्यातील विशेष उपचार सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.

पर्यटन व मानसिक आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाचे करार झाले. सायप्रस चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सोबत मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी सहकार्य करार करण्यात आले असून, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या माध्यमातून बाल मानसिक आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

या परिषदेदरम्यान वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन, एआय-आधारित शिक्षण, रोबोटिक शस्त्रक्रिया तसेच उद्योग-अकॅडेमिया सहकार्य यावर सखोल चर्चा झाली. विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, आरोग्य संस्था आणि उद्योग क्षेत्रासोबत महत्त्वाचे करार करण्यात आले.

परिषदेमुळे महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र बनवण्यास मदत – मंत्री हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित PULSE 2026 परिषदेमुळे महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र बनवण्यास, इनोव्हेशन हब विकसित करण्यास आणि हेल्थकेअर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला चालना देण्यास मोठी मदत होणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सार्वजनिक, खाजगी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत तज्ञ, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि औषध कंपन्यांसोबत दर्जेदार शिक्षण टिकवण्यासाठी व्यापक चर्चा झाली.

एकूणच, PULSE 2026 च्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, गुंतवणूक आणि आरोग्य क्षेत्रातील “हेल्थ सिटी” संकल्पनेला बळकटी मिळाल्याचा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

PULSE 2026मुळे आरोग्य शिक्षण, गुंतवणूक आणि नवकल्पनांना चालना; ‘महाराष्ट्र घोषणा’द्वारे पुढील दिशा स्पष्ट – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, आरोग्य शिक्षण मजबूत करणे ही केवळ सार्वजनिक आरोग्याची गरज नसून ती मोठी आर्थिक संधीही आहे.

गुंतवणुकीच्या दृष्टीने Nipro Pharmapackaging ने 200 कोटी रुपये, Pharmax ने 470 कोटी रुपये आणि Savvycare ने 50 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. ही गुंतवणूक राज्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्कमध्ये Ramky Infrastructure आणि MIDC यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सध्या 17,000 हून अधिक वैद्यकीय शिक्षणाच्या जागा उपलब्ध असून, हे देशातील सर्वात मोठे वैद्यकीय शिक्षण नेटवर्क आहे. येथील विद्यार्थी अमेरिका, युनायटेड किंगडम, मध्यपूर्व आणि आग्नेय आशियामध्ये सेवा देत आहेत.

परिषदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या Vision 2030 वर चर्चा, एआय आधारित शिक्षण प्रणालीचे सादरीकरण, तसेच डॉ. मफ्फजल लकडावाला यांचे रोबोटिक शस्त्रक्रिया प्रात्यक्षिक यांसारखी महत्त्वाची सत्रे पार पडली. ARTPARK, 4basecare, KhushyBaby आणि Yashraj Biotechnologies यांसारख्या स्टार्टअप्सनीही सहभाग नोंदविला.

परिषदेत शेवटी “महाराष्ट्र घोषणा” सादर करण्यात आली, ज्यामध्ये Hinduja, Birla, CIDCO, MIDC, MMRDA यांसारख्या संस्थांचा सहभाग होता.

एकूणच, PULSE 2026 द्वारे महाराष्ट्राने आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक, गुणवत्ता आणि नवकल्पना यांना गती देत विकसित महाराष्ट्र 2047 च्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त अनिल भंडारी, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे आदी उपस्थित होते.

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp