Pune | Thu, 23 April 2026

Ad

परभणीत पोलिस यंत्रणा अधिक गतिमान; ३१ वाहनांचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

Sunil Goyal | 3 views
परभणीत पोलिस यंत्रणा अधिक गतिमान; ३१ वाहनांचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

परभणी, दि. २३ : परभणी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिस विभागाला देण्यात आलेल्या ३१ नवीन वाहनांमुळे गस्त वाढेल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या ‘सद्रक्षण गड’ किल्ल्याचे उद्घाटन व पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या ३१ वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात नक्षलवादाविरुद्ध ठोस कारवाई करण्यात आली असून देश आज नक्षलवादमुक्त झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणा अधिक आधुनिक करण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील पोलिस स्टेशन आणि वसाहतींचे उन्नतीकरण, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि सर्व शहरांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि तपास प्रक्रिया अधिक प्रभावी करणे शक्य होईल.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, पोलिसांचे आरोग्य आणि कल्याण याकडेही विशेष लक्ष दिले जाईल. त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा, ताण-तणाव व्यवस्थापन आणि कामासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच पोलिसांच्या अडचणी तत्काळ आणि प्राधान्याने सोडवून त्यांना अधिक सक्षम व आत्मविश्वासाने कार्य करण्यासाठी आवश्यक सर्व मदत केली जाईल.

प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले की, जिल्हा वार्षिक निधीतून मिळालेल्या ३१ वाहनांमुळे पोलिस दलाला नवसंजीवनी मिळाली असून यामुळे जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेला गती व बळ मिळणार आहे. ‘सद्रक्षण गड’ हा किल्ला शक्ती, पराक्रम आणि चैतन्याचे प्रतीक असून पोलिस दलासाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. नवीन वाहनांमध्ये अत्याधुनिक सुविधा असून ती वातानुकूलित व सीसीटीव्ही यंत्रणांनी सज्ज आहेत. यामुळे पोलिसांचा प्रतिसाद वेळ (रिस्पॉन्स टाइम) सध्या असलेल्या ७ मिनिटे ४० सेकंदांपेक्षा अधिक कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना तातडीने मदत पोहोचविणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp