
नवी दिल्ली,१२: प्रशासकीय सेवेतील अफाट आणि वैविध्यपूर्ण अनुभवांचे संचित केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता, ते साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर येणे ही काळाची गरज आहे. प्रशासनातील संवेदनशीलता जपण्यासाठी आणि कामाचा ताण हलका करण्यासाठी साहित्य हे एक उत्तम माध्यम आहे,असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली आणि ‘सरहद’ संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ऐतिहासिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा तथा निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहंदळे , स्वागताध्यक्षा तथा सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी , संमेलनाच्या निमंत्रक तथा महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला,विशेष आयुक्त श्वेता सिंघल, मुख्य संयोजक सुषमा संजय नहार कार्यवाह श्रीमती पगारिया आणि सहसंयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते.
यावेळी विजया रहाटकर यांनी महिला अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि त्यांच्यातील दडलेल्या साहित्यिक प्रतिभेचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ आणि महाराणी ताराराणी यांनी राज्यकारभाराचा जो आदर्श आणि धोरणीपणा दाखवला, त्याचाच वारसा आजच्या महिला अधिकारी समर्थपणे पुढे नेत आहेत. रोजच्या धावपळीच्या दिनचर्येत अधिकाऱ्यांना अनेक सामाजिक आणि आर्थिक संघर्षांना सामोरे जावे लागते. हे अनुभव जेव्हा कथा किंवा कवितेच्या रूपात कागदावर उतरतात, तेव्हा ते केवळ लेखन न राहता देशाच्या बदलाचे महत्त्वाचे दस्तऐवज ठरतात. आज आपण तंत्रज्ञान आणि आयटीच्या युगात वावरत असताना मानवी संवेदनांची साहित्याशी जोड असणे अधिक गरजेचे झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रश्नांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या लेखणीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी बहिणाबाई चौधरी आणि आचार्य अत्रे यांच्या साहित्याचा संदर्भ देत मराठी भाषेची थोरवी विषद केली.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सुप्रिया देवस्थळी यांनी आपल्या मनोगतातून प्रशासकीय सेवेतील महिलांच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, महिला अधिकाऱ्यांनी केवळ सरकारी कामकाजाच्या फाईलींपुरते मर्यादित न राहता आपल्या अनुभवांतून समाजाचे वास्तव मांडले पाहिजे. संमेलनातील सत्रांचा उल्लेख करताना त्यांनी परराष्ट्र सेवेतील प्रतिभा बारकर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रशासकीय आणि साहित्यिक योगदानाचे कौतुक केले. सेवेतील सुरुवातीच्या काळात महिला अधिकाऱ्यांना करावा लागलेला संघर्ष आणि त्यानंतर त्यांनी सिद्ध केलेले आपले कर्तृत्व हा प्रशासकीय इतिहासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

संमेलनाध्यक्षा लीना मेहंदळे यांनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना आपण चोवीस तास ‘कॉल ऑन ड्युटी’ असतो, मात्र या धावपळीत स्वतःमधील सर्जनशील माणूस जिवंत ठेवणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी संकोच सोडून लेखक आणि संवेदनशील नागरिक म्हणून व्यक्त व्हावे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सेल्फ सर्टिफिकेशन’ धोरणाचे स्वागत करत प्रशासनातील आधुनिक बदलांचा आणि तंत्रज्ञानाचा, विशेषतः ‘युनिकोड’चा प्रभावी वापर करण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
संमेलनाच्या निमंत्रक व महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी प्रशासकीय कर्तव्य आणि साहित्याची सेवा यांच्या संगमावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जेव्हा प्रशासकीय अनुभवाची जोड संवेदनशील लेखणीला मिळते, तेव्हा समाजाकडे पाहण्याचा एक अधिक मानवी आणि न्यायपूर्ण दृष्टिकोन विकसित होतो. संत तुकारामांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, महिला अधिकाऱ्यांनी आपल्या साहित्यातून समाजाला समृद्ध करण्याचे काम केले आहे. लेखणी कधीही थांबत नाही, ती सतत प्रवाहित राहते,असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला.
यावेळी साहित्य संमेलन संयोजन आणि समन्वयासाठी सहकार्य करणारे अधिकारी कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी केले.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनामुळे प्रशासकीय जबाबदारी आणि सृजनशीलता यांचा एक उत्तम संगम पाहायला मिळाला. या समारोप सोहळ्याला देशाच्या विविध भागांतून आलेल्या ज्येष्ठ महिला प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
