
नवी दिल्ली, दि. १२ : महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड ताकद असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द त्यांच्यात उपजत असते. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला केवळ महिला म्हणून न पाहता एक सक्षम अधिकारी म्हणून सिद्ध करणे महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी येथे केले.
नवी दिल्ली येथे आयोजित प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्या दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाल्या होत्या. या संमेलनात विविध सत्रांच्या माध्यमातून प्रशासकीय अनुभव, भाषा-संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
संमेलनाच्या सृजनाची मुक्त झेप स्वप्न आणि वास्तव या विशेष संवाद सत्रात आश्विनी भिडे यांची ऑनलाइन प्रकट मुलाखत दैनिक पुढारीच्या वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी घेतली. यावेळी भिडे यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीतील विविध पैलू उलगडले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि लोकांशी थेट संवाद यामुळे प्रशासनात विश्वासार्हता निर्माण होते, असे नमूद करून त्यांनी वर्क-लाईफ बॅलन्स, कौटुंबिक सहकार्य आणि टीम बिल्डिंगच्या महत्त्वावर भर दिला. सर्वांना सोबत घेऊन काम केल्यामुळेच मेट्रोसारखे अनेक मोठे आणि क्लिष्ट प्रकल्प यशस्वी करता आले, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
मराठीशी समरस होताना या परिसंवादात परराज्यातून महाराष्ट्रात सेवा बजावत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी आपला भाषिक आणि सांस्कृतिक प्रवास मांडला. गृह मंत्रालयाच्या अपर मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांनी मराठी साहित्यातील श्रेष्ठ रचनांच्या अनुवादाची गरज व्यक्त केली, तर संचालक सुमन रावत यांनी ‘जोगवा’ आणि ‘उंबरठा’ सारख्या चित्रपटांतून महाराष्ट्राची संस्कृती जवळून अनुभवता येते असे नमूद केले. याच सत्रात श्वेता सिंघल यांनी भावनांचे महत्त्व अधोरेखित करत, आता मी उत्तर प्रदेशची कमी आणि मराठीच जास्त झाले आहे,अशा शब्दांत आपली मराठी मातीशी असलेली जवळीक व्यक्त केली. त्यांच्या घरी आता मराठी संस्कृती आणि व्यंजने पूर्णतः स्वीकारली गेल्याचेही त्यांनी सांगितले.

संमेलनाच्या पुढील सत्रात भाषा, संस्कृती आणि प्रशासन परराज्यातील मराठी महिला अधिकाऱ्यांचे अनुभव या विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अनुपमा निलेकर यांनी बिहारमधील मराठी समाजाचा उल्लेख करत, तेथील मराठी लोक गणेशोत्सवासारखे अनेक महाराष्ट्रीयन सांस्कृतिक उपक्रम उत्साहाने साजरे करत असल्याचे सांगितले. भारतीय सेवेतील अधिकारी प्रतिभा पारकर यांनी भाषा, संस्कृती आणि साहित्य ही आपली ओळख असून ती जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी अंगोला देशात भारतीय टीम तयार करून मराठी व हिंदी नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार केल्याचे स्पष्ट केले. तर ग्रामविकास विभाग सचिव रोहिणी भाजीभाकरे यांनी स्थानिक भाषा समजून घेण्याचे महत्त्व सांगताना तमिळ भाषा शिकताना आलेले अनुभव हलक्या-फुलक्या शैलीत मांडले. डोरेमॉन’च्या माध्यमातून भाषा शिकण्याचा त्यांचा किस्सा सभागृहात हास्याची लहर पसरवून गेला. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला भाषा आणि संस्कृती जोडतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरण संधी, आव्हाने आणि धोरणात्मक दिशा या विषयावर आयोजित परिसंवादात मान्यवरांनी महिलांच्या प्रशासकीय संधींवर भाष्य केले. भारत सरकारच्या एलपीएआय (LPAI) सदस्य रेखा रायकर यांनी जागतिक स्तरावरील महिलांच्या संघर्षाचा संदर्भ देत ‘जेंडर न्यूट्रल’ प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली. मुख्यमंत्री कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे यांनी कष्टकरी आणि नोकरदार महिलांच्या समस्यांचे स्वरूप भिन्न असल्याचे सांगत प्रश्नांच्या स्वरूपानुसार धोरणे आखली जावीत, असे मत व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य विधी अधिकारी डॉ. निशा चव्हाण यांनी महिलांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने समाजात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले, तर संयुक्त आयकर आयुक्त कविता पाटील यांनी महिलांच्या नैसर्गिक गुणांचा प्रशासकीय कामात सकारात्मक वापर करण्याचा मोलाचा सल्ला दिला.
या संपूर्ण संमेलनातील विविध विशेष सत्रांचे सूत्रसंचालन मंत्रालयातील उपसचिव टीना संखे आणि पुणे येथील उपवनसंरक्षक स्नेहल पाटील यांनी केले. तसेच भारतीय सेवेतील अधिकारी क्रांती खोब्रागडे, सुचिता लोखंडे, अपर आयुक्त प्रांजल चोभे-शिंदे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांनी संवादक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि मराठी साहित्याप्रती असलेली ओढ यांचा एक अनोखा संगम या संमेलनाच्या निमित्ताने राजधानीत पाहायला मिळाला.
