Pune | Sun, 05 April 2026

Ad

राजधानीतील महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचा दिमाखदार सोहळ्याने समारोप 

Sunil Goyal | 12 views
राजधानीतील महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचा दिमाखदार सोहळ्याने समारोप 

नवी दिल्ली, २२ : गुढीपाडव्या निमित्ताने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचा आज समारोप झाला. राज्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनाला दिल्ली व परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची विशेष दखल घेत शुभेच्छा संदेशाद्वारे आयोजकांचे अभिनंदन केले. राज्यातील पारंपरिक हातमाग उद्योगाला नवी संजीवनी देण्यासाठी आणि विणकरांना राष्ट्रीय स्तरावर हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

समारोपप्रसंगी केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विणकरांशी संवाद साधला. राज्याची संस्कृती आणि पैठणीसारख्या पारंपारिक कलेला जागतिक स्तरावर पोहचविणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रदर्शनाच्या आयोजक महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यावेळी आपल्या मनोगतात म्हणाल्या की, “विणकर आणि कारागिरांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांशी जोडणे हा आमचा मुख्य उद्देश होता, जो या प्रदर्शनाद्वारे यशस्वीपणे साध्य झाला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी ग्राहकांसाठी विशेष ‘लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सोनाली पाटील, लीना खाडे आणि दक्षा या विजेत्या ठरल्या. केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री महोदयांच्या हस्ते सहभागी स्टॉलधारकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्टॉलधारकांनी आपल्या भावना व्यक्त करताना उत्कृष्ट संयोजनाबद्दल आभार मानले. या यशस्वी सोहळ्याचे सूत्रसंचालन व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे , सहाय्यक लेखाधिकारी निलेश केदारे यांची उपस्थिती होती.

चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन शो यांसारख्या उपक्रमांनाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा दिल्लीतील नागरिकांना जवळून परिचय झाला. अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी प्रतिक्रिया नागरिकांना व्यक्त केली.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp