
मुंबई, दि. २२: “महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक रोजगाराच्या संधीसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत असून मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचा संकल्प अधिक दृढ करत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
विभागामार्फत १,६१९ रोजगार मेळावे
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने उद्योग, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासात देशात आघाडी घेतली आहे. एप्रिल २०२४ ते जून २०२६ या कालावधीत विभागामार्फत १,६१९ रोजगार मेळावे आयोजित करून ८५,८३४ युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १,३८,६३५ युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यासाठी ₹८९७.६५ कोटींचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे.
याशिवाय राज्यातील २,५०७ कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमधून ३.८४ लाखांहून अधिक युवक प्रशिक्षण घेत आहेत, तर राष्ट्रीय अप्रेंटिसशिप योजनांद्वारे १.७१ लाखांहून अधिक उमेदवार रोजगारक्षम झाले आहेत. राज्यातील आयटीआयमधून दरवर्षी १.५ लाख युवक उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ म्हणून तयार होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अल्पकालीन अभ्यासक्रम, कौशल्य केंद्रे आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना बदलत्या रोजगार बाजारपेठेसाठी सक्षम करण्याचे काम विभाग करत आहे.
उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यात ३६ स्टार्टअप केंद्रे
कौशल्ये विकास केंद्र, अप्रेंटिसशिप, शॉर्ट टर्म कोर्सेस व आयटीआय यांच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षी एकूण सुमारे ७. ५ लाख उमेदवार रोजगार सक्षम झाले आहेत. उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यात ३६ स्टार्टअप केंद्रे, मुख्यमंत्री महाफंड तसेच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. रोजगार शोधणारेच नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे युवक घडविण्याच्या दिशेने विभाग सातत्याने काम करत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्रासाठी दिलेल्या रोजगाराभिमुख विकासदृष्टीला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना अधिक कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि उद्योजक बनविण्याचा संकल्प अधिक दृढ करत आहोत. असेही कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी सांगितले
0000
संध्या गरवारे/विसंअ
