Pune | Thu, 16 April 2026

Ad

राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

Sunil Goyal | 1 views
राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

मुंबई, दि. १५ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,

मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी सूचना

उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ORS घ्यावे, हलके व सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीत विश्रांती घेणे व घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक व मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत आणि उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रशासनाची तयारी

प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जिल्हास्तरावर Heat Action Plan कार्यान्वित करणे तसेच रुग्णालयांत आवश्यक औषध साठा ठेवणे यावर भर दिला आहे. शाळांना सूचना देणे, गरजेनुसार वेळेत बदल करणे आणि माध्यमांद्वारे जनजागृती करणे यासंदर्भातही उपाययोजना करण्यात येत आहेत.

विशेष सूचना

जनसमूह कार्यक्रमांसाठी सावली व पाण्याची सोय करावी, वैद्यकीय मदत व ORS उपलब्ध ठेवावे तसेच कार्यक्रमाचा वेळ शक्यतो बदलावा, असे सांगण्यात आले आहे. कामगार, शेतकरी व बाहेर काम करणाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे, नियमित पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे लक्षात ठेवावीत.

नागरिक, स्थानिक संस्था व उद्योग क्षेत्राने दिलेल्या सूचनांचे पालन करून उष्णतेच्या लाटेमुळे होणारे धोके कमी करावेत, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

०००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp