
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने शासन विविध योजना राबवत असताना, त्या योजनांचा योग्य लाभ घेत स्वतःचा उद्योग उभा करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. अशाच प्रेरणादायी महिलांपैकी एक म्हणजे रेवणगाव येथील सायली राजेंद्र शिंदे. त्यांनी उमेदच्या मदतीने हिरकणी कक्षाच्या माध्यमातून मार्बल ऑरगॅनिक्स या ब्रँडच्या माध्यमातून आयुर्वेदिक व हर्बल कॉस्मेटिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
सायली यांचे माहेर ईश्वरपूर असून सासर रेवणगाव आहे. पती अभियांत्रिकी पदवीधर आहेत. कोरोनासारख्या आव्हानाला तोंड देताना सायली आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी सॅनिटाजझर निर्मिती सुरू केली. यातून त्यांच्या सौंदर्य उत्पादनांच्या व्यवसायाला दिशा मिळाली. प्रारंभी मार्बल ऑरगॅनिक्स जेल यासह एक दोन उत्पादने केली जात. मात्र, व्यवसायवाढीचा विचार सायली यांना खुणावत होता. सायली पूर्वीपासूनच वेगवेगळ्या बचत गटांमध्ये सक्रिय कार्यरत होत्या. त्यातून त्यांनी स्वतःचा हिरकणी स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला. हिरकणी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या मदतीने दोन टप्प्यात सात लाख रूपयांचे आर्थिक पाठबळ मिळाले. त्यानंतर दोन उत्पादनांवरून आज मार्बल ऑरगॅनिक्स वेगवेगळ्या प्रकारची 12 सौंदर्यप्रसाधने तयार करते.
या प्रवासाबद्दल सांगताना सायली शिंदे म्हणाल्या, मार्बल ऑरगॅनिक्स आज फेसवॉश, डे नाईट क्रीम, लिप बाम अशी 12 प्रकारची सौंदर्य उत्पादने तयार करते. त्यासाठी आवश्यक ते परवाने आम्ही घेतले आहेत. आमच्या उत्पादनांमध्ये कोणतीही रसायने वापरली जात नसून, ती पूर्णपणे नैसर्गिक साधनसामग्रीपासून तयार केली जातात. यासाठीचा कच्चा माल रत्नागिरी, मुंबई, गुजरात, दिल्ली येथून आणतो. पती यांच्यासोबतच सासू सासरे यांनीही दिलेल्या पाठिंब्यामुळे आज आपण ही प्रगती साधली असल्याचे त्यांनी सांगितले.
या वाटचालीत “उमेद” (महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान) योजनेचा भक्कम आधार मिळाल्याचे सायली शिंदे आवर्जून नमूद करतात. दोन टप्प्यात मिळालेल्या सात लाख रूपयांच्या कर्जाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा उपयोग त्यांनी उत्पादनासाठी आवश्यक शेड उभारणे, कच्चा माल खरेदी आणि मार्केटिंगसाठी केला. यामुळे उद्योग अधिक सक्षम झाला आणि उत्पादनक्षमता वाढली.
मार्बल ऑरगॅनिक्समुळे केवळ एक उद्योगच उभा राहिला नाही, तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या. आज कं मार्बल ऑरगॅनिक्समध्ये पाचच्या आसपास महिला काम करतात. ग्रामीण भागातील महिलांना कामाची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. उमेदच्या साथीने वाढलेला हा प्रवास 50 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत वाढवायचा मानस सायली शिंदे व्यक्त करतात. यातून गावातील महिलांना कामाची संधी प्राप्त होऊन त्यांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळाली आहे.
सौंदर्य उत्पादनांच्या व्यवसायास म्हटले तर महानगरे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अधिक वाव असतो. पण रेवणगावसारख्या ग्रामीण भागात निर्माण होणारी ही उत्पादने वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरसुद्धा उपलब्ध आहेत. सायली शिंदे यांनी बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. स्वतःच्या www.maarbleorganics.com या अधिकृत वेबसाईटद्वारे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांनी विक्री वाढवली आहे. याशिवाय, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग व ब्रँड सपोर्टच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायाचा विस्तार साधला आहे.
उमेदच्या माध्यमातून मार्बल ऑरगॅनिक्सच्या टीमला मोठी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. तर सायली शिंदे रेवणगाव गावातील महिलांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत.
ग्रामीण महिलांच्या सहभागातून उभा राहिलेला आमचा हा ब्रँड आज अधिक व्यापक स्तरावर पोहोचत आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आणि प्रगतीचे मार्बल ब्रँड प्रतीक बनला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शासनाच्या योजनांचा योग्य वापर आणि मेहनतीच्या जोरावर महिलाही उद्योगक्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
संप्रदा बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
