Pune | Sun, 05 April 2026

Ad

रोबोटिक सर्जरी : क्रांतिकारी बदल घडवणारी प्रणाली -‘पल्स’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे मत

Sunil Goyal | 10 views
रोबोटिक सर्जरी : क्रांतिकारी बदल घडवणारी प्रणाली -‘पल्स’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे मत

मुंबई, दि. २७ : अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या युगात रोबोटिक सर्जरी ही आरोग्य सेवेत क्रांतिकारी बदल घडवणारी प्रणाली ठरत असून, तिचा प्रभावी वापर आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी मजबूत करणे आवश्यक असल्याचे मत ‘पल्स-2026’ या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित ‘पल्स’ 2026 या कार्यक्रमात “नेक्स्ट जनरेशन सर्जिकल रोबोटिक ट्रेनिंग” या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात डॉ.सजल सेन, डॉ. अविनाश सुपे, डॉ. रूमा सिन्हा, डॉ. गगन प्रकाश आणि डॉ. चिन्नाबाबू सुंकावल्ली या तज्ज्ञांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अश्विन ताम्हणकर यांनी केले.

या चर्चासत्रात रोबोटिक सर्जरीची कार्यपद्धती, तिचे फायदे आणि भविष्यातील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तज्ज्ञांनी सांगितले की, रोबोटिक सर्जरीमध्ये 3-डायमेंशनल दृश्य, अधिक अचूक हालचाली आणि हातातील कंप कमी यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित व प्रभावी होते. यामुळे सूक्ष्म स्तरावर काम करणे सर्जनसाठी सुलभ होते.

तज्ज्ञांच्या मते, पारंपरिक व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत रोबोटिक सर्जरीत रुग्णाला कमी वेदना, कमी रक्तस्त्राव, संसर्गाचा धोका कमी आणि जलद बरे होण्याचा फायदा मिळतो. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांना एक ते दोन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडणे शक्य होत आहे.

विशेषतः कर्करोग, मूत्ररोग, स्त्रीरोग तसेच जनरल सर्जरीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले. जागतिक पातळीवर जनरल सर्जरीमध्ये रोबोटिक प्रक्रियांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून भारतातही गेल्या काही वर्षांत या शस्त्रक्रियांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

चर्चेदरम्यान तज्ज्ञांनी असेही नमूद केले की, रोबोटिक सर्जरीमुळे सर्जनला दीर्घकाळ कार्यरत राहणे शक्य होते, तसेच जटिल शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने करता येतात. स्त्रीरोग तज्ज्ञांनी तर आजच्या काळात शक्य असल्यास महिलांना ओपन सर्जरीची गरज नसून मिनिमल ऍक्सेस सर्जरीकडे वळले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

रोबोटिक सर्जरीचा उगम ‘नासा’च्या संशोधनातून झाल्याची माहिती देत, सुरुवातीला अंतराळात शस्त्रक्रिया करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना विकसित करण्यात आली होती, असेही सांगण्यात आले.

तसेच, सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवांमधील दरी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

0000

संजय ओरके/विसंअ

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp