
सातारा, दि. १० : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. सातारा जिल्ह्यात आर्थिक वर्षात १६०० रुग्णांना सुमारे १२ कोटी ९६ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, अर्जांचा तातडीने निपटारा आदी सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउडफंडिंग आदी माध्यमांतून समाजातील मदत करणारी रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, संस्था व दाते यांचे सहकार्य लाभत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.
२० गंभीर आजारांसाठी मदत
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हात व गुडघ्यांचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, भाजलेले (बर्न) रुग्ण, विद्युत अपघातातील रुग्ण अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.
सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाउंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.
आर्थिक वर्षातील मदत
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४०,७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर याच कालावधीत सातारा जिल्ह्यातील १६०० रुग्णांना सुमारे १२ कोटी ९६ लाख २० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया व सामंजस्य करार यांमुळे रुग्णांना वेळेत अर्थसाहाय्य मिळत आहे. गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
0000
