Pune | Mon, 06 April 2026

Ad

सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक – सायबर तज्ज्ञ हिमांशु जोशी

Sunil Goyal | 11 views
सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक – सायबर तज्ज्ञ हिमांशु जोशी

नागपूर , दि. २४:  इंटरनेट व मोबाईल वापरताना दैनंदिन जीवनात घडणारे सायबर गुन्हे, त्याचे विविध प्रकार, त्यापासून वाचण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत अशा सायबर अटॅकच्या जाळ्यात सापडल्यास घाबरुन न जाता यातून सुखरूप बाहेर येता येते, असा विश्वास आज सायबर तज्ज्ञ हिमांशु जोशी यांनी कार्यशाळेत व्यक्त केला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती  विभागाच्या संचालक कार्यालयात ‘सायबर गुन्हे’ विषयावर कार्यशाळा आयोजित  करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. जोशी बोलत होते.  संचालक डॉ. गणेश मुळे अध्यक्षस्थानी होते.

हिमांशु जोशी यांनी सायबर गुन्हे हा विषय समजावून सांगताना डाटा हॅकिंग कशा प्रकारे करण्यात येते व त्यासाठी होणारा डाटाचा  उपयोग विविध दैनंदिन उदाहरणांद्वारे समजावून सांगितला. डिजिटल फुटप्रिंटच्या माध्यमातून समाज माध्यमांवर वापरकर्त्याद्वारे सर्च करण्यात येणारी माहिती देताना त्यांनी सांगितले की, जेंव्हा आपल्या मोबाईल किंवा इंटरनेटचा स्पीड कमी होतो व हे डिव्हाईस गरम होतात तोच तुमचे डिव्हाईस हॅक होण्याचा संकेत असतो.

सायबर बुलिंग, सोशल मिडिया फ्रॉड, डेटा थेफ्ट, फिशिंग आदी सायबर फ्रॉडच्या  प्रकाराविषयी  त्यांनी माहिती  दिली. पासवर्ड कसे ठेवावे. क्यूआर कोड द्वारे व्यवहार करताना घ्यावयाची काळजी,  सार्वजनिक स्थळावरील वायफाय द्वारे होणारे हॅकिंग समजावून सांगताना सार्वजनिक स्थळावरील वायफायचा वापर टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला.

कॉल मर्जिंग स्कॅम, लॉट्री स्कॅम, ऑनलाईन शॉपिंग स्कॅम, कस्टमर केअर स्कॅम याविषयी त्यांनी उदाहरणासहीत माहिती  दिली.  फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम वापरताना होणारी  डाटा चोरी त्यांनी समजावून सांगितली.

सायबर अटॅक पासून असा होईल बचाव

समाज माध्यमांवर बरेचदा चुकीची बातमी  पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो, त्याला फेक न्युज म्हणतात. कोणती बातमी ही फेक न्यूज आहे हे ओळखण्यासाठी pibfactcheckunit (https://www.pib.gov.in/aboutfactchecke.aspx?reg=3&lang=2)  या संकेतस्थळावर ती बातमी अपलोड करून त्याची सत्यता पटते असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांचा डेटा कुठे वापरल्या जातो यासाठी https://haveibeenpwned.com/ या संकेतस्थळाद्वारे माहिती कळते.

डेटा शेअरचा धोका टाळण्यासाठी Google password manager (https://passwords.google.com/?pli=1)  चा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. एसएमएस व व्हाट्सअपद्वारे येणाऱ्या विविध लिंक योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी. virus total.com (https://www.virustotal.com/gui/home/upload) या संकेतस्थळाचा वापर करावा असा सल्लाही त्यांनी दिला.

तत्पूर्वी, संचालक डॉ. गणेश मुळे यांनी प्रास्ताविकात सायबर गुन्हे विषय कार्यशाळे मागील उद्देश स्पष्ट केला. रोज वर्तमानपत्रात सायबर गुन्ह्याबाबत येणाऱ्या बातम्या व त्यातून होणारे फ्रॉड पाहता कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी  यांना या विषयाबाबत माहिती असावी. या माध्यमातून त्यांच्या संपर्कात येणारे त्यांचे नातेवाईक व मित्र यांचीही सुरक्षा होईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी समन्वयक अनिल गडेकर यांनी सायबर तज्ज्ञ हिमांशु जोशी यांचा परिचय करून दिला तर सहाय्यक संचालक पल्लवी धारव यांनी आभार मानले.

000000

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp