Pune | Sun, 15 February 2026

Ad

सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन – विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

Sunil Goyal | 3 views
सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन – विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

मुंबई, दि. ११ : विविध सुरक्षा दलांमुळे  देशात विविध भाषा, संस्कृती असतानाही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ‘वंदे मातरम् : सुरक्षित तटम समृद्ध भारतम्’  सायक्लोथॉन उपक्रमातून देशाच्या एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन घडत आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी केले.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ)  वतीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित सायक्लोथॉन उपक्रमातील सायकलपटूंच्या स्वागत कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीण रंजन, अतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसे, विजय कुमार, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, दिग्दर्शक बोनी कपूर, अभिनेता अहान शेट्टी, विश्वचषक विजेत्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, भारताने जगाला अनेक तत्वे दिली आहेत. त्यापैकी जग हे एक  कुटुंब असल्याचे  ‘वसुधैव कुटुंबकम’ तत्व आहे. विकसित भारतासाठी सुरक्षा दलांचे मोठे सहकार्य राहणार आहे. भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहोत. आज आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. सीआयएसएफने देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेत सीआयएसएफचे कार्य उल्लेखनीय आहे. सायक्लोथॉन हा उपक्रम लोकपयोगी आहे.

महासंचालक प्रवीण रंजन म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशाच्या एकात्मकतेसाठी सागरी किनारी भागात हा उपक्रम राबवित आहे. सीआयएसएफची ४७ युनिट सागरी किनारी भागात आहे. किनारी गावांमध्ये सागरी सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ग्रामस्थांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सागरी सुरक्षेविषयी जागरूक करण्यात येत आहे.

गुजरातमधील लखपतपासून सुरू झालेला सायकलपटूंचा २ हजार ३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून अजून १३०० किलोमीटर प्रवास पूर्ण व्हायचा आहे. तसेच  पूर्व भागात सायकलपटूंचे पथक चेन्नई येथे  पोहचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसे म्हणाले, सागरी किनारी मार्गावरील छोट्या गावांमध्ये सायकलपटू रात्रीचा मुक्काम करीत आहेत. या उपक्रमातून सागरी सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे जात आहे. सायकलपटूंच्या पथकामध्ये ५० टक्के महिला शक्ती आहे.

क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी सायकलपटू केवळ सागरी सुरक्षेचा संदेशच देत नाही, तर पर्यावरण संवर्धन, शारीरिक सुदृढतेचा संदेशही देत असल्याचे सांगितले. दिग्दर्शक बोनी कपूर यांनी  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशातील महत्वाची सार्वजनिक ठिकाणे सुरक्षित ठेवत असून सर्व विमानतळे त्यांच्यामुळे सुरक्षित असल्याचे सांगितले. या उपक्रमाची परंपरा पुढेही कायम राहील. ‘वंदे मातरम्’ च्या राष्ट्रीय गाण्याचे महत्त्व या उपक्रमातून पटवून दिले जात असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

अभिनेता अहान शेट्टी यांनी सायकलपटूंचे अभिनंदन केले.  उपमहानिरीक्षक श्रीमती ममता राहुल यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाला सायकलपटू, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आभार प्रदर्शन सीआयएसएफ (पश्चिम क्षेत्राचे) महानिरीक्षक अभिषेक गोयल यांनी केले.

0000

निलेश तायडे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp