
पुणे दि.१६: लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती मदत करीत आहेत. शासनदेखील अशा धर्मादाय प्रकल्पांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल. रुग्णालयाकडे येण्यासाठी पुरेशा रुंदीचा रस्ता आणि पाण्याची सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल. धर्मादाय संस्थांच्या इमारतींना परवानगी देताना आकारल्या जाणाऱ्या प्रीमियमवर काही प्रमाणात सूट देण्याचा विचारही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
लता मंगेशकर मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने नांदोशी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या रुग्णालय प्रकल्पाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मंजुषा नागपुरे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज प्रत्येक व्यक्तीला उत्तम प्रकारची परवडणारी आरोग्य सुविधा मिळण्याची गरज आहे. धर्मादाय संस्था या क्षेत्रात कार्य करताना बऱ्याचदा असे प्रकल्प चालविण्यासाठी त्यात व्यावसायिकता दिसून येते. मात्र त्यासोबत सेवाभाव कसा असावा हे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दाखवून दिले आहे. हाच अनुभव लता-आशा रुग्णालय प्रकल्पाच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या रुग्णालय प्रकल्पात विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती, रुग्ण पुनर्वसन केंद्र आणि कर्करोग केंद्र असल्याने रुग्णांवर चांगले उपचार होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंगेशकर कुटुंबाने संगीतसेवेसोबत देशाभिमान बाळगून देशसेवेचे कार्य केले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाच्या संकटामध्ये आपल्याकडून काय करता येईल असा विचार करून अनेकांना मदत करणारे हे कुटुंब आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांवर ट्रस्टतर्फे उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयाने सेवेचा सौदा न करता सेवाभाव कायम ठेवून लाखो रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले. हेच कार्य नव्या रुग्णालय प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे नेण्यात येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
दिवंगत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंगेशकर कुटुंबाने जीवनभर स्वरांची सेवा केली आहे. आशाताईंनी जीवनातील कटू अनुभवांना सकारात्मकतेत परिवर्तीत केले. जीवंतपणा ठासून भरलेले त्यांचे व्यक्तीमत्व होते, त्यांनी कधीही नकारात्मकतेला जवळ येऊ दिले नाही. वयाच्या नव्वदीत तीन तासांची मैफल करणे अलौकिक असल्याचेही फडणवीस म्हणाले.

लता-आशा रुग्णालयात माणुसकीची ऊब मिळेल -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस भाग्याचा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळते आहे. यापुढेही नव्या रुग्णालय प्रकल्पामुळे हजारो लोकांना जीवनदान लाभणार आहे आणि अनेक कुटुंबांचे दु:ख दूर होईल, तसेच रुग्णांची जीवन जगण्याची आशा पल्लवीत होईल. मंगेशकर कुटुंबाने गाण्यापलिकडे जाऊन राष्ट्रभक्तीच्या भावनेने सेवा कार्य केले आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांना माणुसकीची ऊब मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुग्णालयात संगीतोपचाराची सुविधा निर्माण करून त्यांना लतादिदी आणि आशा भोसले यांचा स्वर ईश्वराने दिलेले आशिर्वाद असल्याने त्यांची गीते ऐकवावीत, अशी सूचना शिंदे यांनी केली. मंगेशकर कुटुंबाच्या या सेवाकार्यास शासनाकडून सहकार्य मिळेल. लतादीदी आणि आशाताई आपल्यात नसल्या तरी त्या या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांसाठी सूरसंजीवनी बनून राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपले आणि पुढील पिढीचे संगीतविश्व लतादिदी आणि आशाताईंच्या स्वराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आशाताई मराठी अस्मितेचा मानबिंदू होत्या, त्या स्वरांची आकाशगंगा होत्या. आशा नावाच्या स्वरगंगेत सर्व मानवी भावभावना सामावल्या होत्या. आशाताईंना समाजाच्या दु:ख आणि वेदनांची जाणिव होती. त्यांना जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी जीवनाचे रडगाणे न करता आनंदगाणे केले. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा दिवस जीवनातील सर्वात भाग्याचा दिवस असल्याचे ते म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, आपलेपणा असला तर सेवा आपोआप घडते. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अखंड स्वरसेवा केली. म्हणून त्यांचे स्वर मानवी वेदना दूर करणारे आहेत. लता-आशा रुग्णालय प्रकल्पाची सुरूवात दोन्ही गायिकांच्या कार्याला दिलेली श्रद्धांजली आहे. माणसासाठी जीवनावश्यक बाबीत शिक्षण आणि आरोग्य महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टी सर्वांना परवडणाऱ्या आणि सुलभ असण्याची गरज आहे. सर्व प्रकारची चिकित्सा एकाच ठिकाणी उपलब्ध झाली तर रुग्णावर होणारा खर्च कमी होतो. मंगेशकर कुटुंबीयांच्या सेवेच्या दृष्टीकोनानुसार ही योजना नव्या रुग्णालय प्रकल्पात करण्यात आली आहे.
आज समाजात अनेक लोक काही अपेक्षा न करता निष्काम सेवा करीत आहेत. त्यामुळे आपलेपणा टिकून रहातो. नि:स्वार्थ सेवा आणि बंधूभाव यामुळे समाज जुळलेला रहातो आणि चांगुलपणावर विश्वास ठेवून वागतो. त्यामुळे असे सेवा प्रकल्प सुरू रहाणे गरजेचे असून त्यात प्रत्येकाने या मानवतेच्या कामात आपला वाटा उचलला पाहिजे. सर्वांनी प्रयत्न केल्यास समाजातील दू:ख दूर होतील, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.
मिलिंद कुलकर्णी यांनी पं.हृदयनाथ मंगेशकर यांचे मनोगत सादर केले. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृती जतन करताना रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब रुग्णांची सेवा होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आशाताईंचे पूत्र आनंद भोसले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ.धनंजय केळकर यांनी रुग्णालय प्रकल्पाची माहिती दिली. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ४० एकर क्षेत्रात हा रुग्णालय प्रकल्प उभारण्यात येत असून तो देशातील मोठा रुग्णालय प्रकल्प असावा असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, हेमंत रासने तसेच आदीनाथ मंगेशकर यांच्यासह मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय उपस्थित होते.
0000
