Pune | Mon, 20 July 2026

Ad

शिंदखेडा शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार- पालकमंत्री जयकुमार रावल

Sunil Goyal | 6 views
शिंदखेडा शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार- पालकमंत्री जयकुमार रावल

शिंदखेडा नगरपंचायत झाल्यानंतर शहर विकासाला मिळाली गती

नगरपंचायतीच्या बोधचिन्हाचे अनावरण

धुळे, दि. १९ जुलै (जिमाका): शिंदखेडा शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

महात्मा ज्योतिबा फुले सभागृह शिंदखेडा नगरपंचायत येथे पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते शिंदखेडा नगरपंचायतीच्या नविन बोधचिन्ह अनावरण समारंभ संपन्न झाला.  यावेळी नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, तहसिलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, बांधकाम सभापती मनोहर पाटील, यांच्यासह पदाधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले, शिंदखेडा मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरासमोर पिण्याच्या पाण्याची समस्या, अपुरा निधी, जुन्या इमारती आणि मर्यादित नागरी सुविधा अशा अनेक अडचणी होत्या. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करणे हाच प्रभावी पर्याय असल्याची भूमिका घेत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

शहराच्या भविष्यातील विकासाबाबत बोलताना त्यांनी शिंदखेड्यासाठी आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. तहसील प्रशासनाच्या सहकार्याने पाच एकर शासकीय जागा निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणी सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांच्या विकासासाठीही सातत्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. रावल यांनी बोधचिन्हाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करत हे बोधचिन्ह शिंदखेडा शहराचा इतिहास, संस्कृती आणि प्रगतीचे प्रतीक असल्याचे सांगितले. शहराची स्वतंत्र ओळख अधिक बळकट करण्यासाठी सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत उभारण्याची आवश्यकता असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच नगरपंचायतीच्या बोधचिन्ह निर्मितीत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याधिकारी श्री. फागणेकर यांनी प्रास्ताविक केले. अभियंता अमरदीप गिरासे यांनी सूत्रसंचालन केले.

असे आहे बोधचिन्ह

  •  पाटण हद्दीत असलेले परंतु शहराची ओळख असणा-या श्री. आशापुरी माता मंदिराचे प्रतिकात्मक स्वरुप.
  •  १२५ वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या श्री. बालाजी रथाचे प्रतिकात्मक स्वरुप.
  •  शहराची जीवनवाहिनी असणा-या बुराई नदीचे प्रतिकात्मक स्वरुप.
  •  शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणा-या कापसाच्या पिकाचे प्रतिक म्हणुन कापसाचे बोंड.
  •  शहराच्या विकासाचे व प्रगतीचे प्रतिक म्हणून रस्त्याचे प्रतिकात्मक स्वरुप.
  •  शहराचा विकास साधतांना सर्वांचेच हित व सुख साधण्यासाठी कटीबध्द असण्याचे प्रतिक म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद वाक्य.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp