Pune | Fri, 10 October 2025

Ad

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Sunil Goyal | 9 views
थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ०१ : राज्यातील थॅलेसेमिया रुग्णसंख्या वाढू नये तसेच सध्या असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी म्हटले.

राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल भवन येथे एक पाऊल थॅलेसेमियाकडे या बाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव विलास बेद्रे, संकल्प इंडिया फाउंडेशनचे रजत अग्रवाल, थॅलेसेमिया ग्रुपचे राज्य समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकर, रोटरी क्लबच्या रेखा पटवर्धन तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर म्हणाल्या, थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार असून वेळेवर तपासणी व काळजी घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. थॅलेसेमियाच्या निदानासाठी रुग्णालयामध्ये काही विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्या आहेत. यामुळे वेळेवर निदान होऊन पुढील पिढीत हा आजार पसरण्यापासून रोखता येईल. थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांची थॅलेसेमियाबाबत जागृती करणे, वेळेवर निदान, तपासणी तसेच उपचाराची सोय उपलब्ध करून देणे यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि वैद्यकीय क्षेत्राच्या सक्रिय सहभागातून या उपक्रमाला गती मिळणार आहे. थॅलेसेमियाबाबत जनजागृतीकरिता रोटरी क्लब समवेत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

थॅलेसेमिया रुग्णांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. याअंतर्गत रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची सोय, तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या आजारावरील वैद्यकीय उपचारपद्धती आता प्रगत झाल्या असून, याविषयी आणखी जनजागृती होणे आवश्यक आहे. या जनजागृतीमुळे रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळून त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार असल्याचे राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp