
मुंबई, दि. ८ : सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाच्या जलाशयाचे नामकरण ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे करण्याचा शासन निर्णय आज जलसंपदा विभागाने जारी केला आहे.
उरमोडी धरणामुळे सातारा जिल्ह्यातील सातारा, माण व खटाव तालुक्यांमध्ये कृषी सिंचन क्षेत्रात मोठा वाटा असून यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या जलाशयाचे नामकरण करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव प्राप्त झाला होता. या संदर्भात सातारा जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थानी अशा प्रकारची मागणी केली होती.
सध्या धरणांच्या जलाशयांना महापुरुषांची नावे देण्याबाबत शासनाचे स्वतंत्र धोरण असून या प्रकरणात विशेष बाब म्हणून ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन यांचे सातारकराकडून विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ
