Pune | Sun, 05 April 2026

Ad

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक ; पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

Sunil Goyal | 14 views
वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक ; पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

मुंबई, दि.२८ : “असेसमेंट इनोव्हेशन : मल्टिपल चॉईसच्या पलीकडे” या विषयावर पल्स 2026 अंतर्गत जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी पारंपरिक मल्टिपल चॉईस (एमसीक्यू) परीक्षांपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची गरज अधोरेखित केली. केवळ सैद्धांतिक ज्ञानावर आधारित परीक्षा पुरेशा नसून, प्रत्यक्ष परिस्थितीत निर्णयक्षमता, संवाद कौशल्य, तणावात काम करण्याची क्षमता आणि रुग्णांशी वागण्याची पद्धत यांचेही मूल्यमापन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

या चर्चासत्रात ग्रँड मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय रंधारवर, डॉ गौतम खन्ना, मेट्रोपोलिस फौंडेशनच्या अध्यक्ष, डॉ. दुरू शाह,  उत्तर प्रदेशच्या केजिएम्यू च्या वैद्यकीय शिक्षण विभाग प्रमुख आणि नर्सिंग च्या अधिष्ठाता डॉ. अमिता पांडे आणि ग्लोबल ऐंग्जेमेंट अँड एज्युकेशन युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे प्रा. डॉ. पृथ्वी सुकुमार यांनी सहभाग घेतला.

चर्चेत ओएससीई, सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण, डिजिटल साधने आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन या पद्धतींचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष कामासाठी तयारी अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच, भारतात कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन (सीबीएमई) सुरू झाल्यानंतर काही सकारात्मक बदल झाले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप पूर्णपणे प्रभावीपणे झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले. विशेषतः शिक्षण आणि मूल्यमापन यामधील विसंगती दूर करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.

डिजिटल लॉगबुक, राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नसंच, प्रशिक्षित परीक्षक आणि प्रादेशिक मूल्यमापन केंद्रे उभारण्याचे सुचविण्यात आले. यामुळे देशभरात एकसमान आणि विश्वासार्ह मूल्यमापन प्रणाली विकसित होऊ शकते, असे मत मांडण्यात आले.

या चर्चासत्रातून वैद्यकीय शिक्षण अधिक व्यावहारिक, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करण्यासाठी मूल्यमापन पद्धतीत व्यापक सुधारणा आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp