Pune | Mon, 06 April 2026

Ad

विधानसभाप्रश्नोत्तरे

Sunil Goyal | 13 views
विधानसभाप्रश्नोत्तरे

दिव्यांग कल्याण विभागाची जिल्हास्तरावरील यंत्रणा सक्षम करणार – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई,दि.२४  : राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाशी संबंधित वेतन आणि अनुदान प्रक्रियेत गैरव्यवहार होवू नये यासाठी शासनाने सखोल तपासणी सुरू केली असून, ज्या संस्थांची कागदपत्रे व प्रक्रिया स्पष्ट  आहेत, त्यांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. राज्यात जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली.

विधानसभेत आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते. त्यांनी सांगितले की, दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्र केल्यानंतर स्वावलंबनाशी संबंधित अनेक योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात जिल्हास्तरावर प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. संबंधित उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर नियमित नियुक्त्या करण्यात येतील.

मंत्री सावे म्हणाले की, दिव्यांगांसाठी कौशल्य विकासावरही शासनाने भर दिला आहे. राज्यात 18 ते 45 वयोगटातील दिव्यांगांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. ज्या लाभार्थ्यांची नोंदणी किंवा कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवले जात आहेत. सध्या राज्यात 110 कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रे कार्यरत असून, त्यामध्ये सुमारे 1040 निवासी आणि 1029 अनिवासी विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. दिव्यांगांसाठीच्या योजनांमध्ये पारदर्शकता ठेवत, गैरव्यवहार पूर्णपणे थांबवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या प्रश्नाच्या चर्चेत आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार श्वेता महाले यांनी सहभाग घेतला.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना; एलिव्हेटेड रोडसाठी केंद्राकडे प्रस्ताव राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि.24 : पुणे येथील नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड रोड प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य भीमराव तापकीर यांनी याबाबत प्रश्न  उपस्थित केला होता.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. रस्त्याचा उतार अत्यंत तीव्र नसला तरी ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून एलिव्हेटेड रोड उभारणे आवश्यक आहे.

मागील चार वर्षांची अपघातांची आकडेवारी देताना मंत्री कदम यांनी सांगितले की, 2022 मध्ये 12 अपघात झाले होते, 2023 मध्ये तीन, 2024 मध्ये पाच, तर 2025 मध्ये अपघातांची संख्या वाढून 16 झाली आहे. मृतांची संख्या 2022 मध्ये चार, 2023 मध्ये दोन, 2024 मध्ये तीन असून, 2025 मध्ये एका अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 11 वर पोहोचली होती. जखमींना आवश्यक ती आर्थिक मदत आणि उपचारही देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की,  संबंधित ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. अपघात होवू नयेत म्हणून रस्त्याची रुंदी 7 मीटरवरून 10.5 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच वेगमर्यादा 60 किमी प्रतितासवरून 40 कि.मी. करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस बंदोबस्त वाढविणे, स्वयंसेवकांची नियुक्ती, तसेच जड वाहनांसाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त बैठका घेऊन विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, कायमस्वरूपी तोडगा म्हणून एलिव्हेटेड रोड प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहेच असेही त्यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शंकर जगताप यांनी सहभाग घेतला.

००००

संध्या गरवारे/वि.सं.अ.

 

अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरमधून गॅस चोरीप्रकरणी कारवाई – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. २४ : अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव बायपास रोडवर टँकरमधून गॅसची चोरी करून अनधिकृत साठा करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. आमदार संजय पोतनीस यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम राबवण्यात आली. संबंधित टँकर पुण्यातून–छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, वाहतुकीदरम्यान काही टँकर चालक गॅसची जाणीवपूर्वक गळती करून त्याची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. हा चोरी केलेला गॅस काही ठिकाणी थांबून अनधिकृतरित्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवहार सुरू होते, त्या सर्व ठिकाणांवर छापे टाकून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

राज्यमंत्री कदम म्हणाले की, या प्रकरणात केंद्र सरकारचा अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला असून, त्याअंतर्गत कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे. गरज भासल्यास हा कायदा आणखी कडक करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. अलीकडेच पुण्यात तीन टँकर पकडण्यात आले आहेत, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून नियमित कारवाई सुरू असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp