Pune | Fri, 17 April 2026

Ad

विधिमंडळात विद्यार्थ्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याशी साधला संवाद

Sunil Goyal | 4 views
विधिमंडळात विद्यार्थ्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याशी साधला संवाद

मुंबई, दि. १७ : विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळा येथील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला भेट दिली. या भेटीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी अतिशय सोप्या आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत विधिमंडळाचे कामकाज उलगडून सांगितले. “जशी शाळेत शिस्त पाळली जाते, तसेच विधानभवनातही नियमांचे काटेकोर पालन केले जाते. नियम मोडल्यास इथेही शिक्षा होते,” असे सांगत त्यांनी वरिष्ठ व कनिष्ठ सभागृह, सदस्यांची रचना आणि नियमांची अंमलबजावणी याबाबत रंजक उदाहरणांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारत संवाद रंगवला.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांशी गप्पांच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय आणि धोरणांची माहिती दिली. एका चिमुकल्या विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मुलांच्या नावासमोर आई आणि वडिलांचे दोघांचेही नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे लहानपणापासूनच स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये रुजण्यास मदत होईल.

तसेच, मुलांमध्ये स्वयंशिस्त निर्माण व्हावी आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी इतर देशांच्या धर्तीवर सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबत विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमात अनिकेत तटकरे यांनी दोन्ही सभागृहांची सविस्तर माहिती दिली, तर जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अधिकारी व शाळेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp