Pune | Tue, 17 March 2026

Ad

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Sunil Goyal | 1 views
विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि.१७ : राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंशी लोकभवन, मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. विद्यापीठांनी आपले राष्ट्रीय मानांकन सुधरावे व त्यासाठी वेळोवेळी लक्ष निर्धारित करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली.

राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी या दृष्टीने विद्यापीठांनी शाळा – शाळांशी संपर्क वाढवावा व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे. या दृष्टीने ‘स्कुल – कनेक्ट’ या कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे, अशी महत्वाची सूचना राज्यपालांनी केली. हा कार्यक्रम राबवताना नवीनता व चाकोरीबाहेरच्या संकल्पना रुजू कराव्या असेही राज्यपालांनी सांगितले.

महिला सक्षमीकरण तसेच कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून महिलांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सुरु केलेला ‘स्वयंसिद्धा’ हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण असून तो देखील विद्यापीठांनी गांभीर्यपूर्वक राबवावा अशी सूचना राज्यपालांनी केली.

‘स्कूल – कनेक्ट’ व ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा लोकभवनातर्फे घेण्यात येईल असे सांगून विद्यापीठांनी या दोन्ही उपक्रमांसंदर्भात  आपला त्रैमासिक अहवाल नियमितपणे लोकभवन येथे पाठवावा, असे राज्यपालांनी सांगितले.

वरील दोन्ही उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यापीठांना पदक किंवा चषक प्रदान करण्याबाबत विचार केला जाईल, असेही राज्यपालांनी सांगितले.

ज्या विद्यापीठांचे उपक्रम यशस्वी ठरतील त्या विद्यापीठांचे उपक्रम इतर विद्यापीठांमध्ये राबवले जातील असे देखील राज्यपालांनी सांगितले.  आपण लवकरच सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंशी चर्चा करू असेही राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यापीठांतर्फे सुरु असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी,  विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन,  महिला सक्षमीकरण, स्वयंसिद्धा उपक्रम, कौशल्य विकास, ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम, आदी विषयी माहिती दिली.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp