Pune | Tue, 17 March 2026

Ad

विद्यार्थी व नागरिकांना शैक्षणिक, अन्य दाखले सहज मिळण्यासाठी कार्यवाही करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Sunil Goyal | 5 views
विद्यार्थी व नागरिकांना शैक्षणिक, अन्य दाखले सहज मिळण्यासाठी कार्यवाही करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ०६: विद्यार्थी व नागरिकांना महसूल यंत्रणेमार्फत दिले जाणारे विविध दाखले सहज मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जावी. यादृष्टीने सेतू केंद्र व महसूल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात महासूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार महेश बालदी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. यावेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, विद्यार्थी व नागरिकांना शैक्षणिक व इतर दाखले विनासायास सहज मिळावे, यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र आणि महसुल यंत्रणा अधिक सक्षम करण्यात यावी. अनुचित बाबी रोखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या दाखले वितरण प्रक्रियेची कसून तपासणी करावी.

यावेळी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत दाखले वितरणासाठी उभारलेल्या आधुनिक सेतू केंद्र, अभिप्राय कक्ष आणि दाखल्यांसाठी अर्जावर एका दिवसात कार्यवाही प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.

०००

किरण वाघ/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp