
मुंबई, दि. ९ : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास गती देण्यात द्यावी, असे निर्देश उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

मंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात झाली. यावेळी पणन व रोजगार हमी मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु, सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाजनकोचे संबंधित अधिकारी तसेच मे. टी.पी. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत सुमारे 1350 एकर एकूण क्षेत्रांपैकी अंदाजे 400 ते 500 एकर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावावरील तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमार्फत मौजे मेथी व विखरन (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे 250 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एकूण 540.05 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यामध्ये खासगी वाटाघाटीद्वारे 476.06 हेक्टर, भूसंपादन अधिनियमांतर्गत 28.66 हेक्टर तसेच शासकीय 34.91 हेक्टर जमिनीचा समावेश आहे.
यापूर्वी यांनी सुमारे 900 एकर जमीन सौर प्रकल्पासाठी देऊन उर्वरित सुमारे 400 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, यात संबंधित बाबींचा सर्वंकष आढावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.
०००
संजय ओरके/विसंअ
